पारावरच्या नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
>>दुर्गेश आखाडे
व्यावसायिक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अगोदर एक रंगभूमी गावागावात आपलं अस्तित्व टिकून आहे. ती म्हणजे पारावरची रंगभूमी. कोकणात पारावरच्या नाटकांची मज्जा काही औरच आहे. नाटय़गृहात जाऊन प्रयोग पाहाता येत नाहीत किंवा परवडत नाहीत अशा नाटय़प्रेंमीसाठी पारावरची रंगभूमीच करमणुकीचं केंद्र. पारावरच्या रंगभूमी करमणुकीबरोबरच कलाकार घडविणारी एक प्राथमिक शाळा आहे. या पारावरच्या नाटकातून अनेक कलाकार घडले. अशाच एक कलाकार म्हणजे शोभना मयेकर.

रंगभूमी हे कलाकाराचं जग आहे. रसिक प्रेक्षकांच्या दृष्टीने रंगभूमीवरून सादर होणारी कला ही करमणूक असली तरी कलाकार रंगभूमीवर जगत असतो. कारण तो कलाकार ती भूमिका जगत असतो. व्यावसायिक रंगभूमी आणि प्रायोगिक रंगभूमीच्या अगोदर एक रंगभूमी गावागावात आपलं अस्तित्व टिकून आहे. ती म्हणजे पारावरची रंगभूमी. कोकणात पारावरच्या नाटकांची मज्जा काही औरच आहे. नाटय़गृहात जाऊन प्रयोग पाहाता येत नाहीत किंवा परवडत नाहीत अशा नाटय़प्रेंमीसाठी पारावरची रंगभूमीच करमणुकीचं केंद्र. पारावरच्या रंगभूमी करमणुकीबरोबरच कलाकार घडविणारी एक प्राथमिक शाळा आहे. या पारावरच्या नाटकातून अनेक कलाकार घडले. रत्नागिरीतील आरे गावातील शोभना मयेकर यांनी पारावरच्या नाटकांतून अभिनयाचे धडे गिरवत या क्षेत्रात सुरूवात केली.

एखादा कलाकार अचानक येत नाही आणि मग रिप्लेसमेंटची संधी मिळालेले अनेक कलाकार पुढे व्यावसायिक रंगभूमीवर चमकताना आपण पाहिले आहेत. पण शाळेच्या स्नेहसंमेलनात रिप्लेसमेंट करणारी व्यक्ती पुढे अभिनेत्री म्हणून नावारूपाला येते अशी ओळख आहे ती शोभना मयेकर यांची. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी अचानक एकांकिकेतील प्रमुख भूमिका करणारी मुलगी आजारी पडली. त्यामुळे अचानक त्या एकांकिकेतील प्रमुख पात्र साकारण्याची म्हणजे त्याची रिप्लेसमेंट शोभना मयेकर यांनी केली आणि त्यांची रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला.

त्या एकांकिकेतील भूमिकेचे कौतुक त्यांच्या घरापर्यंत पोहचलं होतं. म्हणून महाविद्यालयात असताना त्यांना बालनाटय़ शिबिरात जाण्याची संधी शोभनाताईच्या मोठय़ा बंधूराजांनी दिली. महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात शोभनाताईंनी एक परफॉर्मन्स सादर केला होता. त्याला पारितोषिकेही मिळाली. त्यांच्या या परफॉर्मन्सची बातमी अजित पाटील या रंगकर्मीच्या कानावर पोहचताच त्यांनी एका नाटकात संधी देताच पारावरच्या आणि स्पर्धेच्या नाटकांचा शोभनाताईचा प्रवास सुरू झाला. पार आणि उत्सवाच्या नाटकातून सुरू झालेला प्रवास थेट राज्य नाटय़ स्पर्धेपर्यंत येऊन पोहचला. गावच्या रंगकर्मीसाठी गुणवत्ता सिध्द करण्याचं, एकमेकांशी स्पर्धा करण्याचे हक्काचं व्यासपीठ म्हणजे राज्य नाटय़ स्पर्धा होय. 1992 साली शोभनाताईंनी आरोप या नाटकात काम करताना राज्य नाटय़ स्पर्धेतील पहिलवहिलं रौप्य पदक पटकावलं. राज्य नाटय़ स्पर्धेतील रौप्यपदकाची कमाई कलाकाराच्या अंगावर मूठभर मांस वाढवून जाते. त्यानंतर वेडा वृंदावन या नाटकातील व्यक्तिरेखेसाठी कोतवडे येथील स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावलं. त्यानंतर राज्य नाटय़ स्पर्धेत गाजलेल्या समर्थ रंगभूमीच्या मु.पो. देवाचे गोठणे या नाटकातील व्यक्तीरेखेसाठी शोभनाताईना अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले होते. सुहास भोळे यांच्या मृत्युर्मा या नाटकातील व्यक्तिरेखेने दुसऱया रौप्यपदाकाची कमाई करून दिली. दोन रौप्यपदकानंतर शोभनाताईला एक आत्मविश्वास मिळाल्याने त्यांना व्यवसायिक रंगभूमी खुणावू लागली.

खरे तर बालनाटय़ शिबिरात पाठवणारा मोठा भाऊ, रत्नागिरीत रिहर्सलसाठी जाण्याकरिता तिकिटाचे पैसे देणारी आई याव्यतिरिक्त शोभनाताईला या क्षेत्रात फारसा कुणाचा पाठिंबा किंवा कुणी गॉडफादर नव्हता. तरीही कोकणातल्या लाल मातीत घडलेली कणखर मुलगी मुंबईत पोहचली. त्या चंदेरी दुनियेत स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला. पहिली संधी मिळाली ती ‘खरंच आई रिटायर होतेय?’ या नाटकात. ‘श्वास’च्या यशानंतर अरुण नलावडे ‘बाईमाणूस’ हा चित्रपट करत होते. त्या चित्रपटात शोभनाताईला संधी मिळाली. त्यापूर्वी ‘लाभले सौभाग्याचे देणे’ या चित्रपटात प्रमुख नायिकेच्या मैत्रिणीची भूमिका करण्याची संधी त्यांना मिळाली होती. मग पुढे काही दिवस कामाची प्रतीक्षा करावी लागली. ई टीव्हीवरील क्राईम डायरीतील काही भागांमध्ये शोभनाताईनी भूमिका साकारल्या. झी मराठीवरील अस्मिता मलिकेच्या काही भागात त्यांना संधी मिळाली. ‘तू माझा सांगाती’ या तुकाराम महाराजांच्या जीवनावरील मालिकेतही त्यांनी भूमिका केली आहे. अलीकडच झी मराठीवर गाजलेल्या ‘अगं बाई सासुबाई’ मालिकेत विश्वासच्या आईची भूमिका शोभनाताईनी अप्रतिम साकारली. सोनी टीव्हीवरील ‘मेरे साई’ मालिकेतही त्या दिसल्या. अलीकडे ‘एक झुंज वाऱयाशी’ या नाटकात त्या श्रीनिवास नार्वेकर यांच्यासोबत काम करत आहेत. ‘लॉक डाऊन’नंतर या नाटकाचे प्रयोग थांबले आहेत. माईघाट या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आहे.

ज्येष्ठ नाटकाकार प्र.ल.मयेकर यांनी मुंबईत राज्य नाटय़ स्पर्धेत त्यांच्या ‘अनंत अवशिष्ठ’ या नाटकात काम करण्याची संधी शोभनाताईला दिली. पारावरच्या नाटकाला कुणी कमी समजू नये. पारावरच्या रंगभूमीने अनेक कलाकार घडवले आहेत, असे शोभनाताई सांगताना अजित पाटील, सुहास भोळे आणि कै. अविनाश फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचा आवर्जून उल्लेख करतात.

पारावरच्या नाटकांत काम करताना अनेक अनुभव येतात. असाच एक भन्नाट अनुभव शोभनाताईला आला. एका गावात उत्सवाचा प्रयोग होता. त्या गावातील कलाकारांनी नाटक बसवायचं ठरवलं.त्यांना अभिनेत्री हवी होती म्हणून त्यांनी शोभनाताईंशी संपर्क केला. तालमीसाठी शोभनाताई गावात पोहचल्या तेव्हा त्यांनी जीन्स पँट घातली होती. ते पाहून गावातील एकही बाई त्यांच्याशी बोलायला तयार नव्हती. दुसऱया दिवशी शोभनाताई साडी नेसून गेल्या, त्यावेळी गावातील बायका त्यांना भेटल्या. घरी घेऊन गेल्या आणि आज तुम्ही साडी नेसून आलात ना, तुम्ही आमच्यातल्या वाटता. हा एक आर्श्चयचकित करणारा अनुभव होता.

[email protected]