परभणीत 40 वर्षे जुनी मतदान केंद्रे बदलली, मतदारांकडून संताप व्यक्त

महापालिका निवडणुकीतील मतदानाला आता अवघा आठवडा उरला असताना परभणीत अचानक 40 वर्षे जुनी मतदान केंद्रे बदलण्यात आली आहेत. परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 13, 15, 16 यासह अन्य प्रभागांतील 40 वर्षांहून कायम असलेली मतदान केंद्रे बदलण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांऐवजी चार ते पाच किलोमीटर अंतर दूर मतदान केंद्रे देण्यात आल्यामुळे या प्रभागातील मतदारांनी संताप व्यक्त केला आहे. मतदार याद्यांच्या घोळानंतर आता अचानक मतदान केंद्रे बदलण्याचा घोळ महापालिका प्रशासन आणि निवडणूक विभागाकडून घालण्यात आला आहे. हा निर्णय चुकीचा आहे, असे म्हणत येथील नागरिकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी यासंबंधीची तक्रार आधीच केली आहे. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना आणि काँग्रेस जनआंदोलन करणार आहे. ऐन निवडणुकीत अचानक बदललेल्या मतदान केंद्रांवरून परभणीत संघर्ष होण्याची शक्यता आहे.