परभणी तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग जिंतूररोडला हलवला

732

येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग जिंतूर रोडला एका गोदामात हलविल्यामुळे नागरिकांची मात्र मोठी गैरसोय होत आहे. तहसील कार्यालयाची इमारत टोलेजंग असूनही आणि तेथे जागा उपलब्ध असूनही पुरवठा विभागातील महत्वाचा कार्यभाग जिंतूर रोडला अकारण स्थलांतरीत केला आहे. जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून हा स्थलांतरीत केलेला पुरवठा विभाग तातडीने परभणी तहसील कार्यालयात पुर्नस्थापीत करावा, अशी मागणी जनतेतून आणि सुजान नागरिकातून व्यक्त होत आहे.

नागरिकांना नवीन रेशनकार्डसाठी किंवा रेशनकार्डवरील नावांच्या अदलाबदलीसाठी संगणकावर ऑनलाईन कागदपत्रे सादर करायची असतात. त्यासाठी नागरिक परभणी तहसील कार्यालयात चकरा मारतात. संबंधीत अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्यांना जिंतूर गोदामाकडे पाठविले जाते. तेथे कंत्राटी पगारावरील काही कर्मचारी बसविण्यात आले आहेत. त्यांच्या मनाला वाटेल तशी कामे ते करतात. कारण परभणी तहसील कार्यालयापासून जिंतूर रोडवरील हे गोडाऊनमधील ऑफीस दूर पडते. अर्थातच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कंत्राटी कर्मचारी आणि कामगारावरील नियंत्रण ठेवताना मोठी अडचण होते. नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे या पुरवठा विभागाची जवाबदारी आहे. परंतु त्यांचे सुद्धा याकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने नागरिकांची रेशनकार्ड संदर्भातील कामे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. प्रलंबित कामामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तहसील कार्यालयातच हा पुरवठा विभाग पुर्ववत कार्यरत केल्यास त्यावर तहसीलदार आणि तत्सम अधिकाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण राहु शकते. परंतु आता मात्र उंटावरून शेळ्या राखण्याचा हा प्रकार झाल्या असल्याचे दिसून येते.

जिल्हाधिकारी पी. शिवशंकर हे तरुण, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकारी असून त्यांना नागरिकांच्या या गैरसोयीकडे जाणिकपूर्वक लक्ष घालून जिंतूर रोडवरील गोदामातील पुरवठा विभाग तातडीने परभणी तहसील कार्यालयात आणावा आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला रेशनकार्ड संदर्भातील अन्याय दुर करावा, अशी मागणी सुजान नागरिकातून व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या