लोकल-फलाटामधील जीवघेणा गॅप वाढला!मध्य रेल्वेने पाणी भरणाऱ्या स्थानकातील रुळांची उंची वाढवल्याचा परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने पावसाळ्यात ट्रॅकसह स्थानक परिसरात भरणाऱया पाण्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुळाची उंची वाढवली आहे. त्यामुळे ट्रॅकवर पाणी आल्याने गाड्यांचा होणारा खोळंबा थांबणार असला तरी लोकल आणि फलाटामधील जीवघेणा गॅप सव्वा फुटापर्यंत वाढला आहे. त्यामुळे लोकल पकडताना प्रवासी गाडीखाली येण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबई आणि परिसरात होणाऱया अतिवृष्टीमुळे ट्रॅकमध्ये पाणी भरल्याने अनेकदा मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत होते. परळ, माटुंगा, शीव, कुर्ला, विद्याविहार, भायखळा, चुनाभट्टी, चेंबूर परिसरात पाणी भरते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ट्रकमध्ये खडीचा भराव टाकून रुळांची उंची वाढवली आहे. त्याचा चांगला परिणामही दिसत आहे. मात्र रुळाची उंची वाढवल्याने आता लोकल स्थानकात आल्यानंतर लोकलचे फुटबोर्ड आणि प्रत्यक्ष फलाटामधील गॅप एक-सव्वा फुटापर्यंत वाढला आहे. सदरचा गॅप सुमारे सहा इंच असणे आवश्यक आहे. मात्र सध्या तो गॅप वाढला आहे. त्यामुळे लोकलमध्ये चढताना प्रवासी पडल्यास गॅपमध्ये जाण्याची भीती प्रवासी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ज्या ठिकाणी लोकल आणि फलाटामधील गॅप वाढला आहे तेथेही फलाटाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे. याबाबत रेल्वेकडे विचारणा केली असता सर्व प्लॅटफॉर्मची उंची वाढवली असून एखाद्या ठिकाणी काही समस्या असेल तर त्याबाबत संबंधित अधिकाऱयांना सूचना देण्यात येतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

या स्थानकात वाढला गॅप

परळ स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि चारवर लोकल आणि फलाटामधील गॅप वाढला आहे. शीव स्थानकात फलाट क्रमांक दोन, विद्याविहार स्थानकात फलाट क्रमांक एक आणि दोन, कुर्ला स्थानकात फलाट क्रमांक तीन-चारकरही जीवघेणा गॅप वाढला आहे.