व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देताना पालकांची लूट, युवासेनेची मुंबई विद्यापीठावर धडक; ऑडिशनल मॉनिटरिंग कमिटीमार्फत चौकशीची मागणी

मुंबई विद्यापीठ संलग्नित अनेक महाविद्यालयांत व्यवस्थापन कोटा तसेच विद्यापीठाने परवानगी दिलेल्या अतिरिक्त जागा भरताना पालकांकडून लाखो रुपये उकळून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. या पार्श्वभूमीवर युवासेनेने मुंबई विद्यापीठावर धडक देत अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ऑडिशनल मॉनिटरिंग कमिटी स्थापन करून त्यामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

व्यवस्थापन कोटा तसेच अतिरिक्त जागा भरताना काही महाविद्यालये पालकांकडून लाखो रुपये उकळत असल्याच्या अनेक तक्रारी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्या होत्या. विद्यार्थी आणि पालकांनी केलेल्या या तक्रारींची दखल घेऊन युवासेना सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, प्रदीप सावंत, मिलिंद साटम आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी प्र. कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेतली. या प्रकाराची अ‍ॅडमिशन मॉनिटरिंग कमिटी स्थापन करून त्यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. एमएमएससारख्या अभ्यासक्रमासाठी 20 ते 25 लाख रुपये उकळण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. अशा काही महाविद्यालयांची आम्ही आमच्या पद्धतीने चौकशी करून पुरावे देणार आहोत, असेही सिनेट सदस्यांनी या वेळी सांगितले.