>> निमिष पाटगावकर
पॅरिस ऑलिंपिक समारोप पार पडला. हिंदुस्थानची गेल्या टोकियो ऑलिंपिकमधील 48 व्या स्थानावरून 71 व्या स्थानावरून झालेली घसरण क्रिडाप्रेमींना खट्टू करणारी आहे. मात्र यासोबतच हिंदुस्थानच्या पदरी निराशा का आली, आपलं कुठे चुकतंय हे पाहणंही तितकेच महत्त्वाचे आहे.पारिस ऑलिंपिकचे दिमाखदार समारोप सोहळ्याने सूप वाजले. अमेरिकेने महासत्ता दाखवत पदक तक्त्यात चीनला मागे टाकून पहिला क्रमांक मिळवला आणि ऑलिंपिक ध्वजाचा स्वीकार करत पुढच्या म्हणजे 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकची सूत्रे हाती घेतली. एकीकडे हा दिमाखदार सोहळा चालू असताना हिंदुस्थानच्या पदरी मात्र या ऑलिंपिकने निराशाच पदरात टाकली याचे शल्य होते. हिंदुस्थानची गेल्या टोकियो ऑलिंपिकमधील 48 व्या स्थानावरून आपली घसरण 71 व्या स्थानावर झाल्याने समस्त क्रीडाप्रेमी खट्टू झाले. या घसरणीचे मुख्य कारण म्हणजे आपण सुवर्णपदकापासून वंचित राहिलो आणि केवळ एकच रौप्य पदक आपण मिळवले. पॅरिस ऑलिंपिक पदक तक्त्यात बघितले तर 23 देश केवळ एक सुवर्णपदक जिंकून आपल्या पुढे आहेत. थोडक्यात सांगायचे तर आपण एक सुवर्णपदक जरी मिळवले असते तर आपला क्रमांक क्रमवारीत वर गेला असता. आज पाकिस्तानसारखा देशही एका सुवर्णपदकाच्या जोरावर आपल्यावर म्हणजे 62 व्या स्थानावर आहे हे आपल्या जखमेवर अजून मीठ चोळल्यासारखे आहे.
यंदाच्या ऑलिंपिककडून आपल्याला साधारण दहा पदकांची अपेक्षा होती. ही अपेक्षा ठेवताना आपण तिरंदाजी, बॅडमिंटन, कुस्ती, वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी असेल हे गृहीत धरले होते. जास्तीची दोन-तीन पदके मिळतील ती जर आपण शूटिंगमध्ये उत्तम कामगिरी केली तर मिळायची अपेक्षा होती. प्रत्यक्षात झाले मात्र उलटेच. शूटिंगने आपल्याला पहिली 3 पदके मिळवून दिली आणि भरवशाच्या बाकीच्या सर्व खेळांनी दगा दिला. हे असे का व्हावे, याचा ढोबळमानाने विचार केला तरऑलिंपिकमध्येही आपण क्रिकेटसारखेच अवलंबून होतो. सिंधू, मीराबाई चानू, दीपिका कुमारी आणि नीरज चोप्रा हे आपले पदकाचे दावेदार होते. एक लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे गेल्या ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी केली म्हणून चार वर्षांनी ते तशीच कामगिरी करतील ही अपेक्षा ठेवणे हे चुकीचे आहे. कुठच्याच क्रीडा प्रकारात चार वर्षे हा खूप मोठा कालखंड असतो. ऑलिंपिक हे जगाचे व्यासपीठ असते तेव्हा जगाच्या कानाकोपऱयातून तुमचे प्रतिस्पर्धी तयार होत असतात. आपण नीरज चोप्राचे उदाहरण घेतले तर दुखापतीतून नुकताच सावरलेला नीरज अंतिम फेरीत करोडो हिंदुस्थानींच्या अपेक्षांचे ओझे आणि सुवर्णपदक राखण्याच्या अतिरिक्त दबावाखाली खेळला. नीरजने आजपर्यंत आयुष्यात कधी नव्वद मीटरच्या वर भालाफेक केली नाही. जेव्हा पाकिस्तानच्या नदीमने 92.97 मीटर्सची लांबी गाठली तेव्हा नीरजच्या चेहऱयावर सुवर्णपदक हातातून गेल्याची निराशा स्पष्ट दिसत होती. हिंदुस्थानचा दुसरा भालाफेकपटू जेना हा अंतिम फेरीसाठी पात्रच न ठरल्याने हिंदुस्थानचे सुवर्णपदकाचे आव्हान संपुष्टात आहे.
ऑलिंपिकच्या पदक तक्त्यावर बघितले तर हिंदुस्थानच्या कित्येक राज्यांपेक्षाही आकाराने छोटय़ा असलेल्या देशांनीही एखादे सुवर्णपदक मिळवले आहे. ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकाच्या निमित्ताने मी वेस्ट इंडिजला होतो. आपण ज्याला वेस्ट इंडिज म्हणतो ते छोटे छोटे देश असलेली चिमुकली बेटे आहेत. यातल्या काही देशांचा दाखला द्यायचा तर जमैका, डॉमिनिका, डॉमिनिकन रिपब्लिक, सेंट ल्युसिया यासारख्या देशांनीही सुवर्णपदक कमावून आपल्यापुढचे स्थान पटकावले आहे. हे देश सुवर्णपदक कमावतात, पण आपल्यासारख्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशाला एकही सुवर्णपदक मिळवता येत नाही तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकतंय हेच दिसून येते.
हिंदुस्थानच्या खाशाबा जाधव यांनी 1952 च्या हेलसिंकीऑलिंपिकमध्ये कुस्तीत कांस्यपदक मिळवल्यावर आपला वैयक्तिक पदकांचा दुष्काळ जो चालू झाला तो 1996च्या अटलांटा ऑलिंपिकमध्ये लिअँडर पेसने कांस्यपदक मिळवून संपवला. पुढे राज्यवर्धनसिंग राठोड, अभिनव बिंद्रा, मल्लेश्वरी यांनी पदके मिळवली तरी 2008 च्या बीजिंग ऑलिंपिक यशानंतर आपण ऑलिंपिक पदकांसाठी खरीखुरी आशा ठेवू लागलो. याचे कारण म्हणजे कुणा एखाद्दुसऱया खेळाडूने आणलेल्या पदकांपेक्षा अभिनव बिंद्रा-शूटिंग, सुशील कुमार- कुस्ती आणि विजेंदर सिंग – मुष्टियुद्ध अशी तीन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातली पदके आपण जिंकली आणि सुवर्णपदक आपण पहिल्यांदा बघितले. 2008 ते 2024 या 16 वर्षांचा आणि चार ऑलिंपिकचा कालखंड बघितला तर हिंदुस्थानची प्रगती आशादायक आहे. आज फक्त हॉकीवर अवलंबून न राहता आपण अॅथलेटिक्ससारख्या क्रीडा प्रकारातही पदकाची अपेक्षा ठेवू शकतो हा सकारात्मक बदल आहे, पण अपेक्षा ठेवणे आणि पदक मिळवणे हे अंतर मिटवायला खूप काही करावे लागणार आहे.
आपल्या खेळाडूंची निवड, त्यांचे प्रशिक्षण आणि पदक मिळवायची तयारी ही सर्व प्रक्रिया यासाठी आपण समजून घेतली पाहिजे. युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय विविध खेळातील खेळाडूंना यासाठी मदत करते. नॅशनल स्पोर्टस् फेडरेशन आणि टॉप्स म्हणजे टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीमसारख्या योजनांतून जी मदत खेळाडूंना केली जाते त्या योजना राबवायला नॅशनल स्पोर्टस् फेडरेशन, भारतीय ऑलिंपिक महासंघ आणि स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच साई या तीन संस्था खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण, साधने देण्याची सोय करते. माजी हॉकीपटू वीरेन रस्किन्हा यांनी प्रकाश पदुकोण, गीत सेठी यांच्यासह ऑलिंपिक गोल्ड क्वेस्टसारखी ना नफा ना तोटा तत्त्वावर काढलेली संस्थाही ऑलिंपिकमध्ये पदक आणू शकणाऱया खेळाडूंना मदत करते. वरवर बघता या संस्था, हे उपक्रम संरचनात्मक वाटतात, पण प्रत्यक्ष खेळाडूंना याची किती मदत होते? जसे बॅडमिंटनपटू अश्विनी पोन्नपाने ऑलिंपिक संपल्यावर सांगितले की साईकडून आर्थिक मदत सोडाच तर प्रशिक्षकही मिळाला नाही. तिला आर्थिक मदत म्हणून साईकडून साडेचार लाख आणि प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांसाठी दीड कोटी रक्कम दिल्याची माहिती जेव्हा तिला कळली तेव्हा तिलाच आश्चर्याचा धक्का बसला. हा दीड कोटी खर्च सर्व खेळाडूंच्या प्रशिक्षण शिबिरांवर केला. या एका उदाहरणाने आपले कुठे चुकतेय त्याची थोडीशी कल्पना येते. अनेक खेळाडूंना त्यांचे प्रशिक्षक स्वत निवडायचे असतात. कारण ऑलिंपिक सोडून बाकीच्या अनेक स्पर्धांत त्यांचे वैयक्तिक प्रशिक्षक त्यांना घडवत असतात. मात्र कुणातरी प्रशिक्षकांची वर्णी ऑलिंपिकच्या चमूत होते तेव्हा खेळाडू आणि त्यांचे जमणे एका स्पर्धेपुरते जमणे कठीण असते.
चीनचा ऑलिंपिकमधील उदय बघितला तर ज्या 1952 च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये आपण पहिले पदक कमावले त्याच ऑलिंपिकमध्ये चीनने ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. त्यांना सहभागाची सूचना उशिरा मिळाल्याने त्यांचा फक्त एक जलतरणपटू या स्पर्धेत खेळला. यानंतर मात्र 1984 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकपर्यंत चीन ऑलिंपिकपासून दूर राहिला. या ऑलिंपिकमध्ये त्यांनी तब्बल 32 पदके मिळवून आपली तयारी दाखवून दिली. यानंतर चीनचा आलेख उंचावतच राहिला. याचे प्रमुख कारण चीनच्या ऑलिंपिककडे बघण्याच्या दृष्टिकोनातून आहे. सरकारी स्तरावर चीनचे ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवायचे मिशन आहे. त्यासाठी देशपातळीवरील एक मॉडेल आहे. त्यासाठी प्रत्येक स्तरावर उत्तम निधी उपलब्ध करून दिला आहे. तिथे गुणवत्ता शोधायला धोरणात्मक कार्यक्रम आहेत. चीन ऑलिंपिक सुवर्णपदकच्या ध्यासापोटी प्रचंड निधी खर्च करते, पण तो स्मार्ट खर्च असतो.
हिंदुस्थानने यंदा 117 खेळाडू ऑलिंपिकला पाठवले, पण देशाच्या 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर हरयाणामधून 24 आणि पंजाबमधून 19 खेळाडू या चमूत होते. या दोन छोटय़ा राज्यांतून 43 म्हणजे एकूण चमूच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त खेळाडू होते. महाराष्ट्रातून चार तर उत्तर प्रदेशातून सहा खेळाडू होते आणि तिसरे मोठे राज्य मध्य प्रदेशातून एकही खेळाडू नव्हता. यावरून हेच दिसून येते की, हरयाणाची क्रीडा संस्कृती बाकीच्या राज्यांच्यापेक्षा खूप वेगळी आहे. हिंदुस्थानला जर चीन आणि अमेरिकेची बरोबरी खेळात करायची असेल तर देश-राज्य- जिल्हा-तालुका हे सर्व एका सामायिक साखळीने जोडणे गरजेचे आहे. आपल्या देशाची बाकीच्या प्रांतातली झालेली प्रगती बघता कठीण काहीच नाही. एकदा का ही इच्छाशक्ती आणि यंत्रणा यांची सांगड बसली की
ऑलिंपिकसारख्या स्पर्धेतही आपण ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा’ची आशा नक्कीच ठेवू शकतो.