पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगलाच ‘पंच’ बसणार? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने व्यक्त केली चिंता

बॉक्सिंग या खेळाचे ऑलिम्पिकमधील भवितव्य अंधारात दिसत आहे. शासन संरचना, आर्थिक परिस्थिती व गुणप्रणाली या मुद्दय़ांवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून (आयओसी) चिंता व्यक्त करण्यात आली. याच कारणामुळे 2024 सालामध्ये आयोजित करण्यात येणाऱया पॅरिस ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग या खेळाच्या समावेशाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय बॉकिंग असोसिएशनचा पाय आणखीनच खोलात गेला आहे.

आयओसीकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले की, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने उत्तम प्रशासनाच्या दिशेने पाऊल टाकले आहे, पण अजूनही काही बाबतीत चिंता कायम आहे. या संघटनेच्या प्रशासनात कोणत्याही नवीन टीमची नियुक्ती करण्यात आलेली नाही. याचमुळे पुढील निवडणुकीची तारीख, पात्रता निकष व मूल्यांकन हे आयओसीला जाणून घेण्यास नक्कीच आवडेल, असेही त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.

30 सप्टेंबरपर्यंतच्या अहवालात नमूद होईल

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनकडून यावेळी हमी देण्यात आली की, आतापर्यंत करण्यात आलेल्या तक्रारींवर तोडगा काढण्यात आलेला असेल. तसेच 30 सप्टेंबरपर्यंतच्या ‘प्रोफेसर मॅकलरेन’च्या अहवालात याबाबत नमूदही करण्यात येईल.

जागतिक स्पर्धेत थेट स्कोअरिंग पद्धत असावी

टोकियो ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग स्पर्धा ही आयओसीच्या टास्क फोर्सच्या अधिपत्याखाली खेळवण्यात आली होती. आता पुढल्या महिन्यात सर्बिया येथे होणाऱया जागतिक स्पर्धेसाठी आयओसीकडून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनला सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार ही स्पर्धा थेट स्कोअरिंग पद्धतीने खेळवण्यात यावी.

आपली प्रतिक्रिया द्या