जे सोनेरी क्षण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या दिग्गज खेळाडूंना अनुभवता आले नाहीत, जे क्षण पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रत्यक्षात साकारण्यासाठी हिंदुस्थानचे 169 जणांचे महापथक सज्ज झाले आहे. येत्या 28 ऑगस्टपासून पॅरालिम्पिकचा हा थरार रंगणार आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे 54 पॅरा अॅथलीट 9 खेळांमध्ये सहभागी झाले होते आणि हिंदुस्थानने पाच सुवर्णपदकांसह 19 पदके जिंकली होती. यात आठ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचाही समावेश होता. नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले, पण एकाही खेळाडूला हिंदुस्थानला सोनेरी यश मिळवता आले नव्हते. मात्र हिंदुस्थानी खेळाडूंचे हेच अपयश धुऊन काढण्याचा प्रयत्न पॅरा अॅथलीट करणार आहे.
अॅथलेटिक्समध्ये सर्वात मोठे पथक
हिंदुस्थानची संघात सर्वाधिक खेळाडू अॅथलेटिक्स प्रकारात आपले नशीब आजमावणार आहेत. 12 प्रकारात 84 खेळाडू असले तरी अॅथलेटिक्समध्ये 38 खेळाडू उतरणार आहेत. याच प्रकारात हिंदुस्थानी खेळाडूंचे खासगी प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आहेत. भालाफेकपटू सुमित अंतिल आणि नेमबाज अवनी लेखरा या दोन खेळाडूंना खासगी प्रशिक्षक देण्यात आले असून हे दोघेही टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील आपले सुवर्ण राखण्यासाठी उतरणार आहेत. या क्रीडा महोत्सवात सहभागी दोन लोकांना वगळल्यास उर्वरित सर्व खेळाडूंचा खर्च केंद्र सरकार उचलत आहे. तसेच सर्वांना 50 डॉलर्सचा दैनंदिन भत्ताही दिला जाणार आहे. खेळाडूंच्या मदतीसाठी त्यांना क्रीडाग्रामाच्या बाहेर ठेवण्यात येणार असल्याची माहितीही सांगवान यांनी दिली.
टॉप ट्वेण्टीत येण्याचे लक्ष्य
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी संघ चक्क 71 व्या क्रमांकावर होता. मात्र पॅरालिम्पिकमध्ये पदक तालिकेत टॉप ट्वेण्टी देशांत स्थान मिळवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. यंदा हिंदुस्थानचे खेळाडू किमान दहा सुवर्ण जिंकून नवा इतिहास रचतील, अशी आशा मिशन प्रमुख सत्यप्रकाश सांगवान यांनी व्यक्त केली आहे. गेले चार वर्षे घेतलेली मेहनत पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचेल, असा त्यांना विश्वास आहे.