पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंचा धमाकेदार खेळ सुरू आहे. आज (2 सप्टेंबर) पाचव्या दिवशी हिंदुस्थानच्या योगेश कथुनियाने डिस्कस थ्रो F56 प्रकारात जबरदस्त कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. योगेश ने दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे. त्याने Tokyo Paralympics मध्ये सुद्धा रौप्य पदक पटकावले होते. आजच्या दिवसभरात हिंदुस्थानला आतापर्यंत 3 पदके मिळाली आहेत.
योगेश ने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 42.22 मीटरचा सर्वोत्तम थ्रो फेकला. त्यानंतर 41.50 मीटर, 41.55 मीटर, 40.33 मीटर, 40.89 आणि सहावा थ्रो 39.68 मीटरचा फेकला. डिस्कस थ्रोच्या F56 प्रकारात ब्राझीलच्या बतिस्ता डॉस सॅटोंस क्लॉडनी याने 46.86 मीटरचा थ्रो फेकत सुवर्ण पदक पटकावले, तर ग्रीसच्या त्झोनिस कॉन्स्टँटिनोसने 41.32 मीटरचा थ्रो फेकत कांस्यपदक पटकावले.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या खात्यात आतापर्यंत आठ पदके जमा झाली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, तीन रोप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे. हिंदुस्थानसाठी पहिली दोन पदके महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात अवनि लेखरा (सुवर्ण) आणि मीना अग्रवाल (कांस्यपदक) यांनी पटकावून दिली. त्यानंतर प्रीती पालने महिलांच्या 100 मीटर शर्यतीत (T35) कांस्यपदक जिंकत हिंदुस्थानला तिसरे पदक पटकावून दिले. त्यानंतर पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात मनीष नरवालने रौप्य पदक पटकावले, तर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 प्रकारात रूबीना फ्रान्सिस हीने कांस्यपदक पटकावले. प्रीती पालने महिलांच्या 200 मीटर शर्यतीत T35 प्रकारात चमकदाक कामगिरी करत हिंदुस्थानसाठी सहावे आणि वैयक्तिक दुसरे कांस्यपदक पटाकवले. त्याचबरोबर निषाद कुमारने उंच उडीत T47 प्रकारात रौप्य पदक जिंकत हिंदुस्थानची पदक संख्या सातवर पोहचवली.