विमाने आणि एसटी योग्य जागी पार्क करा , ‘निसर्गा’च्या तडाख्यात सापडू नयेत म्हणून इशारा जारी

563
mumbai-airport

मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर धडकणार्या निसर्ग चक्रीवादळाने हरी हरेश्वर, अलिबाग ते डोंबिवली, नवीमुंबई थेट डहाणूपर्यंत ताशी १२० कि.मी. वेगाने वाद‌ळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात विमाने सापडू नयेत म्हणून ती हँगरमध्ये पार्क करण्याचे आदेश नागरी हवाई उड्डयन संचालनालयाने दिले आहेत. तर एसटी महामंडळाने त्यांच्या गाड्या झाडांशेजारी किंवा त्यांच्या सावलीखाली पार्क करु नयेत असे आदेश दिले आहेत.

मुंबईच्या अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यात छोट्या विमानांचे नुकसान होऊ शकते, विविध हेलिपॅडवरील हेलिकॉप्टर, अन्य चार्टर विमानांची खबरदारी घेण्याचे आदेश नागरी हवाई उड्डयन संचालनालयाने दिले आहेत. या विमानांचे एकतर उड्डान टाळा किंवा त्यांना सुरक्षितपणे हँगरमध्ये पार्क करण्यास सांगितले गेले आहे. तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी उपसण्याचे मोठे पंप बसविण्यात आले आहेत. दुसरीकडे एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना एसटी बसेस पार्क करताना झाडाच्या सावलीत किंवा शेजारी करु नयेत असे आदेश दिले आहेत. तसेच डिझेल टाक्यांची झाकणे उघडी ठेऊ नका ती घट्ट बंद करण्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

मानखुर्द येथे नौदलाची पाच बचाव पथकं
नौदलाच्या आय‌एन‌एस तानाजी तळाच्या पाच रेस्क्यू टीम मानखुर्द परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत. या रेस्क्यू टीम मुंबई परिसरातील आपात्कालीन टीम संपर्क ठेवून असतील‌ असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. त्यांच्या ताब्यात रबरी डिंगी बोटीसह सर्व प्रकारची आयुधे देण्यात आली आहेत.

निसर्ग चक्रीवादळामुळे एअर इंडियाने अजून काही स्पष्ट केले नसले तरी इंडिगोने आणि विस्टराने मात्र आपली विमाने रद्द केली आहेत. इंडिगोने मुंबईत येणारी आणि जाणारी १७ विमाने रद्द केली आहेत. विस्टाराने देखील मुंबई-दिल्ली-मुंब‌ई आणि मुंबई-कोलकाता-मुंब‌ई विमाने रद्द केली आहेत. इंडिगो केवळ तीन फ्लाईट चालविणार आहे ती खालीलप्रमाणे –

6E 495 मुंबई – चंदीगड

6E 6179 मुंबई – रांची

6E 5373 मुंबई – पाटणा

आपली प्रतिक्रिया द्या