परळीतील मराठा क्रांती ठोक मोर्चास वाढता पाठींबा

38

सामना प्रतिनिधी । परळी

परळी येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील पिंपळनेर आणि नाळवंडी जिल्हा परिषद सर्कलमधील युवकांनी मोटरसायकल रॅली काढली. मराठा समाजास आरक्षण मिळावे, मेगा भरती रद्द करावी, आंदोलनातील गंभीर गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यासाठी रॅली काढण्यात आली. त्यात ५०० ते ६०० दुचाकींसह युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. परळी तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनात रॅलीतील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

गेल्या १८ दिवसापासून परळी येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत असून आंदोलकांचे बळ वाढवण्याासाठी विविध ठिकाणाहून मराठा समाज बांधव आंदोलनस्थळी दाखल होत आहेत. शुक्रवारी माजलगाव येथील मराठा डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आंदोनस्थळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांची भेट घेतली. माजलगाव तालुक्यातील मराठा डॉक्टरांचा आंदोलनास पाठींबा असल्याचे पत्र त्यांनी यावेळी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या