
परळी म्हणजे बिहारचा बाप झाल्याची गंभीर परिस्थिती सध्या तिथे निर्माण झाली आहे , असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय म्हणाल्या आहेत. या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक लोक आम्हाला म्हणतात आम्ही तुम्हाला माहिती देऊ, फक्त आमचं नाव देऊ नका, असं दमानिया म्हणाल्या. माध्यमांशी संवाद साधताना त्या असं म्हणाल्या आहेत.
दमानिया यांनी आपल्या सोशल मीडियावर परळी आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांची माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केले आहेत. याचदरम्यान धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा केली आहे.
अंजली दमानिया यांनी परळीतील परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, “परळीतील दहशत ही मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. जर एकट्या परळीत 109 मृतदेह सापडत असतील, तर त्या जिल्ह्याची स्थिती काय असेल?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्या म्हणाल्या की, फक्त तीन प्रकरणांची चौकशी व्यवस्थित सुरु आहे, बाकीच्या 106 प्रकरणांमध्ये चौकशीचे काम योग्य रीतीने होत नाहीय. या संदर्भात त्यांनी आरोप केला की, या क्षेत्रातील पोलीस यंत्रणेवर स्थानिक आमदार आणि वाल्मीक कराड यांचा कंट्रोल आहे. हा कंट्रोल यंत्रणेवरचा निघाला पाहिजे, यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा होणं महत्वाचं आहे, असं त्या म्हणाल्या.































































