खासदारांच्या वेतनाला 30 टक्के कात्री, संसदेचे शिक्कामोर्तब

कोरोनाचे कारण पुढे करत नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी अखेर संसद सदस्यांच्या वेतनावर तीस टक्क्यांची कात्री चालवलीच. लोकसभेत यासंदर्भातले विधेयक यापूर्वीच मंजूर झाले होते. राज्यसभेने आज त्यावर आवाजी मतदानाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे खासदारांना तीस टक्के कमी वेतन आणि दोन वर्षे खासदार निधीविना सार्वजनिक जीवनात काम करावे लागणार आहे.

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी राज्यसभेत संसद सदस्य वेतन भत्ते व दुरुस्ती विधेयक मांडले व ते आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांची एकूण खासदारांची संख्या 780 असून तीस टक्के वेतन कपातीमुळे प्रति महिना 2 कोटी 34 लाखांची बचत होणार आहे.

होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल विधेयकाला मंजुरी

राज्यसभेने आज होमिओपॅथी सेंट्रल कौन्सिल विधेयकाला आवाजी मतदानाने मंजुरी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी यासंदर्भातले विधेयक शुक्रवारी सभागृहात मांडले. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

अशोक गस्ती व कपिला वात्साययन यांना राज्यसभेत श्रद्धांजली

राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक गस्ती व राष्ट्रपती नियुक्त माजी खासदार व थोर विदुषी ‘पद्मश्री’ कपिला वात्साययन यांना आज राज्यसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या सन्मानार्थ कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले. अशोक गस्ती गेल्या मार्च महिन्यातच कर्नाटकमधून भाजपकडून राज्यसभेवर निवडून आले होते. कोरोनामुळे संसदेचे अधिवेशन लांबणीवर पडल्याने 22 जुलै रोजी त्यांनी केवळ राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. प्रत्यक्षात सभागृहात येऊन स्थानापन्न होण्यापूर्वीच गस्ती यांचे निधन झाल्याने संसद वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.

सहस्रबुद्धेंमुळे संसद भवनात घबराटीचे वातावरण

भाजपचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांना कोरोना झाल्यामुळे संसद भवनात घबराटीचे वातावरण आहे. सहस्रबुद्धे हे सत्ताधारी बाकावर बसतात. त्यांच्या आसपास बसणाऱया खासदारांमध्ये यामुळे अस्वस्थता आहे. राज्यसभेच्या लॉबीतही फिरले होते. त्यामुळे सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. जे कोणी त्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वतःहून विलगीकरण करावे, असे आवाहन तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी केले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी घेऊन हेच सहस्रबुद्धे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडेही गेले होते. आता मानवाधिकार आयोगातही सहस्रबुद्धेंमुळे घबराट निर्माण झाली आहे.

छोकरावरून लोकसभेत गदारोळ

पीएम केअर फंडावरून आज लोकसभेत जबरदस्त हंगामा झाला. विरोधकांच्या प्रश्नाने सरकार बेजार झाले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पीएम केअर आणि सरकारचा बचाव करताना छोकरा शब्द वापरल्याने लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला व कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. करसंबंधी विधेयकावर माझ्याऐवजी राज्यमंत्री अनुराग ठाकूर बोलतील असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. त्यानंतर विरोधक व ठाकूर यांच्यात जुंपली. पीएम केअर फंडाचा गांधी, नेहरू घराण्यातील कोणाकोणाला लाभ झाला आहे हे उघड करेन असा इशारा ठाकूर यांनी दिला त्याचवेळी त्यांनी छोकरा या शब्दाचा उल्लेखही केला. काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी त्याला तीव्र हरकत घेतली. इथेही तुम्हाला पंडित नेहरू हवेतच का, असा टोला सत्ताधाऱयांना लगावत त्यांनी ठाकूर यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी करत सभात्यागही केला.

आपली प्रतिक्रिया द्या