पारनेरच्या चिकन मार्केट जवळ कावळे मृत्यूमुखी पडले, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतले नमुने

पारनेर शहरातील बाजारतळाजवळ असलेल्या चिकन मार्केटजवळ गेल्या दोन दिवसांत चार कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या देशात बर्ड फ्लूने थैमान घातले असून, कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला की, इतर कारणांमुळे याचा शोध घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

पारनेर बाजारतळावर मोठय़ा संख्येने झाडी असून, त्यावर नेहमीच कावळ्यांचे अस्तित्व असते. देशभरात बर्ड फ्लूमुळे पक्षांचा मृत्यू होत असताना तालुक्यात मात्र आजवर अशा घटना घडलेल्या नव्हत्या. दोन दिवसांपूर्वी बाजारतळावर दोन कावळे मृतावस्थेत आढळून आले. नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सफाईदरम्यान ते कचरा डेपोमध्ये टाकून दिले. पुन्हा बुधवारी दोन कावळे मृतावस्थेत आढळून आले. त्यापैकी एक तर नगरपंचायत कार्यालयामोरच पडलेला होता. त्यासंदर्भात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहलता गावारे यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी त्या मृत कावळ्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. अहवालानंतरच कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे किंवा इतर कारणांमुळे झाला याचा उलगडा होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या