दुर्देवी घटना ! परिक्षेला जात असताना दोन विद्यार्थ्यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

पारनेरमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. तालुक्यातील वाळवणे येथून पारनेरकडे निघालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सुपे पारनेर रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेने वाळवणे गावावर शोककळा पसरली आहे.

ओंकार आदीनाथ पठारे (20), मयुर रामदास थोरात (19) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही वाळवणे येथील रहिवासी आहेत. ओंकार व मयुर पारनेर महाविद्यालयात संगणकशास्त्रच्या पहिल्या वर्गात शिकत होते. आज दुपारी दोन वाजता त्यांचा व्दितीय सत्र परिक्षेचा पेपर होता. त्यासाठी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते वाळवणे येथून मोटारसायकलवरून पारनेरकडे जाण्यासाठी निघाले होते.

सुपे-पारनेर रस्त्यावर जांभूळओढा परिसरात पुढे चाललेल्या ट्रकला ओलांडून पुढे जात असताना मोटारसायकल घसरून ट्रकसमोर आली. मोटारसायकल ट्रकखाली अडकून दोघेही ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले आणि चिरडून जागीच ठार झाले. घटनेची माहीती समजताच सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. नितिनकुमार गोकावे घटनास्थळी दाखल झाले. ट्रकखाली चिरडलेले ओंकार व मयुर यांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पारनेर ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदनानंतर वाळवणे येथे दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघांवर वाळवणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ओंकार व मयुर हे दोघेही शेतकरी कुटूंबातील आहेत.दोघेही अभ्यासात हुशार होते. संगणक शास्त्राची पहिल्या वर्षाची परीक्षा देण्यापूर्वीच दोघांवर काळाने घाला घातला. त्यांच्या अपघाती निधनामुळे वाळवणे व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.