
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील 1800 कोटींच्या 40 एकर जमीनप्रकरणी घोटाळ्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत सरावासारव केली आहे. आपला या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
मला कुठलीही माहिती नाही. माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वये देखील संबंध नाही. मला ३५ वर्षे महाराष्ट्रातील जनता ओळखते. या प्रकरणी मी संपूर्ण माहिती घेणार आहे. कारण मागे तीन-चार महिन्यापूर्वी असं काहीतरी चाललं असल्याचं कानावर आलं. त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही. असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करू नयेत, अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या. पण त्यानंतर परत काय झालं ते मला माहिती नाही. परंतू आता मीडियामध्ये जमिनीबद्दल बरचं काही सांगितलं जातंय. काय कागदपत्र आहेत, कोणी परवानगी दिली? त्याची संपूर्ण माहिती घेणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठेतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलं नाही. उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगेन, जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल, असे अजित पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, याची चौकशी करतो. जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. तो त्यांचा अधिकार आहे. जर उद्या कुठल्याही बाबतीत कोणा काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं, त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्यात काय नक्की घडलं ते पाहणं हे सरकारचं कामच आहे. मी त्याची माहिती घेऊन परत माध्यमांना भेटेन, असे अजित पवार म्हणाले.





























































