
एस.टी. स्टँडवरील कंट्रोल रूममध्ये शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून, त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (7 फेब्रुवारी) सकाळी घडली. या प्रकरणी एका प्रवाशावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
चिपळूण एस.टी. स्टँड येथे विनायक भास्कर कुसाळकर (55) हे वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. 7 फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:२० च्या सुमारास चिपळूण रेल्वे स्टेशनवरून प्रवाशांनी गच्च भरलेली एक बस (एमएच 20 बीएल ४०३०) स्टँडवर आली. बसमधील गर्दी पाहून मंगेश मनोहर चव्हाण (२९, रा. भोम) या प्रवाशाचा पारा चढला. त्याने थेट कंट्रोल रूम गाठून “इतके प्रवासी का घेतले?” असा जाब विचारत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
निवडणुकीमुळे गर्दी असल्याचे कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापलेल्या मंगेशने कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली. रागाच्या भरात त्याने कंट्रोल रूमच्या दर्शनी भागावर जोरात हात मारून काच फोडली. यात त्याच्या हातालाही दुखापत झाली. इतकेच नव्हे तर, टेबलवरील संगणक खाली पाडून त्याचेही नुकसान केले.
घटनेनंतर आरोपी मंगेश चव्हाण घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी तातडीने शोध घेत त्याला गुहागर नाका परिसरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी विनायक कुसाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.




























































