
इंग्लंडविरुद्धची ऍशेस मालिका जिंकल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱयावर लक्ष केंद्रित करत आहे. आगामी तीन टी-20 सामन्यांसाठी संघ जाहीर झाला असला तरी, टी-20 विश्वचषक संघातील पॅट कमिन्स, जॉश हेझलवूड आणि यांना टीम डेव्हिड यांना वगळण्यात आल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान टी-20 मालिका 29 जानेवारीपासून सुरू होणार असून पुढील दोन सामने 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला होतील. ही मालिका टी-20 विश्वचषकापूर्वीची महत्त्वाची तयारी मानली जात आहे. पाकिस्तान दौऱयानंतर ऑस्ट्रेलिया थेट विश्वचषकासाठी रवाना होणार असून 11 फेब्रुवारीला कोलंबो येथे आयर्लंडविरुद्ध मोहिमेला सुरुवात करणार आहे.
युवारक्ताला संधी देताना पर्थ स्कॉर्चर्सचा वेगवान गोलंदाज माहली बिअर्डमन आणि सिडनी सिक्सर्सचा उदयोन्मुख प्रतिभा जॅक एडवर्ड्स यांना संघात स्थान देण्यात आले आहे. बिग बॅश लीगमधील प्रभावी कामगिरीचे हे फळ असल्याचे निवडकर्त्यांचे मत आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघासाठी दुखापतींची चिंता कायम आहे. कमिन्स पाठीच्या दुखापतीतून पूर्ण सावरलेला नसल्याने विश्वचषकातील पहिल्या दोन-तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता असल्याचे मुख्य निवडकर्ता यांनी स्पष्ट केले. मात्र हेझलवूड आणि डेव्हिड वेळेत तंदुरुस्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बॅकअप म्हणून अतिरिक्त वेगवान गोलंदाज संघात ठेवण्यात आले असून, गरज पडल्यास त्यापैकी एखाद्याला विश्वचषकासाठी पुढे नेले जाऊ शकते. पाकिस्तान दौऱयानेच ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषक रणनीतीची दिशा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.


























































