माजी मंत्री आणि भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचा लोकार्पण सोहळा उद्या (दि. 5) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते वांगी येथील सोनहिरा सहकारी कारखाना कार्यस्थळी सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानिमित्त कडेगाव येथे महाविकास आघाडीच्या महामेळाव्याची तयारीही करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा व राज्यभरातून लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येथे व्यासपीठ आणि मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वीस एकरांवर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या सोहळ्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या सभेसाठी राज्यभरातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत, शिवाय दोन लाख लोकांची उपस्थिती असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डॉ. पतंगराव कदम यांचे ‘लोकतीर्थ’ या स्मारकस्थळी आकर्षक बगिचाही साकारला आहे. या सोहळ्यानिमित्त लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, काँगेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत.
‘लोकतीर्थ’ स्मारकस्थळी प्रमुख पाहुण्यांचे आमदार डॉ. विश्वजीत कदम स्वागत करणार आहेत. त्यानंतर डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकास अभिवादन करून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण करण्यात येणार आहे.
‘लोकतीर्थ’ दीपस्तंभ – आमदार विश्वजीत कदम
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ या स्मारकाचे बांधकाम एक भौतिक स्मारकाची इमारत नाही, तर पलूस-कडेगावसह राज्याच्या विकासाचा इतिहास आहे. हे स्मारक वर्तमान आणि उज्ज्वल भविष्याची दिशा देणारा दीपस्तंभ आहे. येथे साकारत असलेले वस्तुसंग्रहालय हे डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वाचा पुरावा आहे. त्यामुळे हे स्मारक जनतेला दिशादर्शक ठरेल, अशी भावना आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.