‘केईएम’मध्ये एकाच बेडवर दोन रुग्ण; संसर्गाचा धोका, रुग्णांची मोठी हेळसांड, तातडीने सुधारणा करण्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात एकाच बेडवर दोन रुग्ण ठेवल्याने या रुग्णांना एकमेकाच्या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला असून रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी रुग्णालयाला भेट दिल्यानंतर वॉर्ड ‘क्र. 4 – ए’मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात दर्जेदार आणि अद्ययावत सुविधा मिळत असल्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो रुग्ण दरोज येत असतात. त्यामुळे या रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. मात्र शतकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केईएम रुग्णालयात सध्या रुग्णांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी रुग्णालयाला भेट दिली असता हा प्रकार समोर आला. वॉर्ड क्र. 4-एमध्ये सर्व बेडवर दोन दोन रुग्ण ठेवण्यात आल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

विशेष म्हणजे शतक महोत्सव साजरा करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या केईएम प्रशासनाने रुग्णांच्या गैरसोयींकडे लक्ष द्यावे, अशी मागणही चौधरी यांनी केली.

रुग्णांना सुविधा द्या, अन्यथा आंदोलन

केईएममधील गैरसोयींबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सुधारणा होत नसल्यामुळे शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. मात्र अजूनही परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे आता तर प्रशासनाने रुग्णांना आवश्यक सुविधा देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा पुन्हा एकदा शिवसेना स्टाईल जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार अजय चौधरी यांनी दिला.