होय फाशीच! निर्भयाच्या दोषीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

716
nirbhaya convicts

2012 साली झालेल्या निर्भया प्रकरणातला महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निर्भयाचा दोषी पवन कुमार गुप्ता याची विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. 2012मध्ये निर्भया प्रकरण घडलं तेव्हा आपण अल्पवयीन होतो. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल देतेवेळी या बाजूकडे दुर्लक्ष केलं होतं, असा दावा पवनने केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने यावर सुनावणी करताना दाखल केलेल्या याचिकेत कोणतीही नवीन तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पवन याची याचिका फेटाळून लावण्यात आली असून आता त्याच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निकालावर निर्भयाची आई आशा देवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेगवेगळ्या याचिका दाखल करून फाशी टाळण्याचा दोषींचा मनसुबा उधळला आहे. त्यांना 1 फेब्रुवारी रोजी जेव्हा फाशी दिली जाईल, तेव्हाच माझ्या मनाला समाधान वाटेल. जसं आता ते एका मागोमाग एक याचिका दाखल करून कायद्याचा खेळण्यासारखा वापर करत आहेत, तशाच प्रकारे त्यांना एका मागोमाग एक अशी फाशी देण्यात यायला हवी. तरच त्यांना कायद्याशी खेळल्याचा परिणाम काय असतो, ते समजेल, अशा शब्दांत आशा देवी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

16 डिसेंबर 2012 रोजी हे भयंकर प्रकरण घडलं होतं. एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी सामूहिक अत्याचार केले होते. त्यावेळी तिला अतिशय नृशंस मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणामुळे अवघा देश हादरून गेला होता. माध्यमांनी या तरुणीचं नाव निर्भया असं ठेवलं होतं. या भयंकर घटनेनंतर 29 डिसेंबर 2012 रोजी उपचारांदरम्यान निर्भयाचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणात सहा आरोपी होते. त्यापैकी एका आरोपीने तुरुंगातच आत्महत्या केली होती. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली होती. हे प्रकरण गुन्हे इतिहासातल आजवरचं भयंकर आणि दुर्मिळातील दुर्मीळ असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. या गँगरेप प्रकरणात मुकेश, विनय शर्मा, अक्षय सिंह आणि पवन गुप्ता या चार नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी रोजी या चारही जणांना तिहार येथे फाशी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या