मध्यरात्री नदीकाठी पुरात अडकलेल्या महिलेचा वाचवला जीव; गुन्हे शाखेच्या पोलिसांसह वन्यजीव संस्थेची कार्यतत्परता

मावळ तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला असल्याने मंगळवारी रात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी नदीलगतच्या भागात गस्त सुरू असताना गोडुंब्रे येथे पवना नदीलगत एका महिलेचा वाचवा वाचवा… असा ओरडण्याचा आवाज पोलिसांना आला. पोलिसांनी पाहिले असता एक महिला पुराच्या पाण्यात अडकल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ हा प्रकार वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला कळविला.

करत पोलिसांच्या सहकार्याने पथकाने महिलेस सुखरूप बाहेर काढले आणि तिचा जीव वाचला मीनाक्षी मनोज पारधे (वय संस्थेची 30, रा. सोमाटणे) असे सुखरूप वाचलेल्या महिलेचे नाव आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मावळ तालुक्यात पावसाचा हाहाकार उडाला आहे. 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, सहायक निरीक्षक श्रीधर भोसले, हवालदार प्रशांत पवार, अंजनराव सोडगीर, दयानंद खेडकर, राजेंद्र इघारे, प्रशांत सोनावणे असे पेट्रोलिंग करत होते. शिरगाव ते कासारसाई रोडवर गोडुंब्रे येथे पवना नदीलगत कोणी तरी वाचवा…वाचवा… असे ओरडत असल्याचा आवाज पोलिसांना आला. प्रशांत सोनवणे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना हा प्रकार कळविला. त्या अनुषंगाने गराडे यांनी तत्काळ पथकातील सभासद विनय सावंत, कमलेश राक्षे यांच्याशी संपर्क साधला. ते तातडीने त्या ठिकाणी पोहोचले. मुसळधार पाऊस सुरू असतानादेखील मदत कार्य करत पोलिसांच्या सहकार्याने पथकाने त्या महिलेस एका झाडाला लटकलेल्या अवस्थेमधून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्या महिलेस प्राथमिक उपचारासाठी पवना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.