
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारच्या काळात रखडली आहे. अनेक शिवभोजन केंद्र चालकांना राज्य सरकारकडून वेळेत थकबाकी मिळत नसल्यामुळे केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवभोजन केंद्र चालकांची थकबाकी लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोरगरीबांना आधार देण्यासाठी शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत अवघ्या दहा रुपयांत गरीबांना पोटभर जेवण मिळते. राज्यभरात 1800 हून अधिक शिवभोजन केंद्र असून या केंद्र चालकांना राज्य सरकार अनुदान देते. महायुती सरकारच्या काळात गेल्या अनेक महिन्यांपासून या केंद्र चालकांची थकबाकी रखडली आहे. जागेचे भाडेदेखील दिले जात नसल्यामुळे केंद्र चालकांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, आमदार सुनील प्रभू यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन केंद्र चालकांची पैफियत मांडली.
मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
यासंदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली. शिवभोजन केंद्र चालकांची थकबाकी द्या, अशा सूचना आजच आपण मुख्य सचिवांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत केंद्र चालकांना थकबाकी मिळेल, असा विश्वास सुनील प्रभू यांनी व्यक्त केला आहे.






























































