तिरंग्याबद्दल केलेले वक्तव्य मेहबूबा मुफ्तींच्या अंगाशी, ‘पीडीपी’तील तीन नेत्यांचा राजीनामा

देशाच्या तिरंगा राष्ट्रध्वजाबद्दल पीपल्ड डेमोक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केलेले वक्तव्य त्यांना महागात पडले आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा 370 कलम लागू होईपर्यंत आपण तिरंगा हाती घेणार नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. या विधानामुळे नाराज झालेल्या पीडीपीच्या तीन नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

पीडीपीचे नेते टी. एस. बाजवा, वेद महाजन आमि हुसैन ए. वफा यांनी मेहबूबा मुफ्ती यांना पत्र लिहून त्यांनी तिरंग्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. अशा वक्तव्यामुळे देशभक्तीच्या भावनांना ठेच लागते, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने

मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्त्यांनी पीडीपीच्या कार्यालयाबाहेर तिरंगा फडकावून आपला निषेध नोंदवला. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न

दरम्यान, जम्मू-कश्मीरची राजधानी श्रीनगरमधील लाल चौकातील क्लॉक टॉवरवर तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱया तीन भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही ते ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत होते.

आपली प्रतिक्रिया द्या