दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर मंगळवारी बदलापुरात उसळलेला जनप्रक्षोभ, तब्बल आठ तास झालेला रेल रोको, दहा तास झालेले शहर बंद आंदोलन आणि सरकारविरोधात उडालेल्या असंतोषाच्या भडक्यानंतर पोलिसांनी आज बदलापूर शहरात जमावबंदीचे 144 कलम लागू केले. त्यामुळे रस्त्यांवर काहीसा शुकशुकाट होता. सर्व शाळांनी सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थी घराबाहेर पडले नाहीत आणि प्रशासनाने इंटरनेट बंद केल्याने परस्परांचा संपर्क तुटला होता. त्यामुळे मंगळवारी आंदोलनाने पेटलेले बदलापूर आज काहीसे शांत झाले असले तरी बदलापूरकरांच्या मनात होती ती भीती, चिंता, अस्वस्थता आणि प्रचंड तणाव…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपकडून चालवण्यात येणाऱ्या बदलापूरच्या कात्रप येथील आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर संस्थाचालकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी तक्रार दाखल करण्यासाठी पीडित चिमुकल्यांसह आलेल्या पालकांना अकरा तास ताटकळत ठेवले. त्यात एका पीडित मुलीच्या गर्भवती आईचाही समावेश होता. या प्रकरणाला वाचा फुटताच एरवी शांत आणि नाकासमोर चालणाऱ्या मध्यमवर्गीय बदलापूरकरांच्या संतापाचा स्फोट झाला आणि मंगळवारी हजारो बदलापूरकरांचे आग्या मोहोळ रस्त्यावर उतरले. तब्बल दहा तास अख्खे बदलापूर शहर ठप्प झाले.
दोन-चार तास आंदोलन चालेल आणि नंतर आंदोलक निघून जातील या भ्रमात असलेल्या प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला हे आंदोलन हाताबाहेर गेल्याचे कळताच त्यांची तंतरली. संध्याकाळी कसेबसे आंदोलन आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासूनच बदलापुरात 144 कलम लागू करत जमावबंदी जाहीर केली. पाचपेक्षा जास्त लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली. कोणतेही संदेश एकमेकांना मिळू नये यासाठी प्रशासनाने इंटरनेट ठप्प करू टाकले. त्यामुळे इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, एक्स आणि फेसबुक पूर्णपणे बंद होते. याचा मोठा फटका पत्रकारांना बसला. कार्यालयात बातम्या पाठवण्यासाठी त्यांना बदलापूर ते अंबरनाथ अनेकदा प्रवास करावा लागला. बँका, शासकीय कार्यालयांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेचा धसका शाळांनीही घेतला. त्यामुळे आज बदलापुरातील अनेक शाळा बंद असल्याने विद्यार्थीही घराबाहेर पडले नाहीत.
शहराला छावणीचे स्वरूप
पोलिसांकडून आंदोलकांची सकाळपासून धरपकड सुरूच होती. संपूर्ण बदलापूर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. जागोजागी पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. त्यामुळे मंगळवारच्या आंदोलनानंतर आज शहरात शांतता होती. 144 कलम लागू झाल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी होती. तर काही परिसरात शुकशुकाट होता. आंदोलन संपले तरी वातावरणातील भीती आणि तणाव कायम होता.
संस्थाचालक मोकाट का?
कंत्राटी किंवा कायमस्वरूपी कर्मचारी कामावर ठेवण्यापूर्वी त्याच्या चारित्र्याची पोलीस ठाण्यातून पडताळणी व्हायला हवी होती. मात्र अशा प्रकारची कोणतीही काळजी या शाळेचे संस्थाचालक असलेले भाजपचे शहर उपाध्यक्ष आणि शाळा संस्थेचे सचिव चेतन शरद आपटे यांनी घेतली नाही. दोन चिमुकलींवर शाळेतील स्वच्छता कर्मचारी अक्षय शिंदे याने लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याने दोनच नव्हे तर असंख्य चिमुरडय़ांवर लैंगिक अत्याचार केला असावा. त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी सुरवातीलाच केली. मात्र चेतन आपटे आणि संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांनी हे प्रकरण उडवून लावले आणि प्रकरण दडपण्यासाठी पालकांवर दबाव आणला. संस्थाचालक आपटे आणि कोतवाल यांनी भारतीय जनता पक्षाशी संबंधित शाळा असल्याने संस्थेची बदनामी नको यासाठी पोलीस एफआयआर घेण्यास नाकारत होते. आपटे बंधूंनी सीसीटीव्हीचे फुटेजही नष्ट केले, असा आरोप बदलापूरकरांनी केला आहे. मात्र पोलिसांनी अद्यापही या संस्थाचालकांवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई का केली नाही, असा संतप्त सवालही बदलापूरकरांनी केला.