Peaky Blinders – आवड असणाऱ्यांनी आवर्जून बघावी

6804

>> प्रतीक राजुरकर

शंभर वर्षांपूर्वीची  काल्पनिक कथा Peaky Blinders नावाच्या वेबसिरिजच्या माध्यमातून आजच्या काळात सुध्दा जवळजवळ तीस तास आपल्याला खिळवून ठेवते. प्रत्येक Season चे सहा भाग असे एकूण पाच Season. पहिल्या महायुद्धात अतुलनीय योगदान दिलेल्या तीन भावांची व कुटुंबाची ही कथा. युद्धानंतर ब्रिटनच्या गुन्हेगारी विश्वात शून्यातून स्वतःचे साम्राज्य व वर्चस्व उभे करणारे Shelby कुटुंब एकत्रित असल्याने येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामर्थ्याने सामोरे जाते. Thomas Shelby ची भूमिका ताकदीने साकारणारा अभिनेता Cellian Murphy अभिनयात अतिशय सरस ठरलाय. अमिताभच्या शारीरीक उंचीपेक्षा कमी पण अमिताभ बच्चन पेक्षा ‘आंय’ संवाद फेकतांना तो अभिनयात अमिताभ पेक्षा कितीतरी पटीने उंच भासतो. एकत्रित कुटुंबातील सर्व गुणदोष, विवाहानंतरचे गृहकलह, महत्वाकांक्षा पाश्चात्य संस्कृतीला सुध्दा अपवाद ठरत नाहीत. व्यक्ती तितक्या प्रवृत्तींची उत्कृष्ट मांडणी ही Peaky Blinders ची जमेची बाजू. एकीकडे प्रचंड हिंसा, क्रौर्य तर दुसरीकडे करुणेची दृश्य, अश्लीलते सोबत शालिनता व प्रेमाचे प्रसंग तर मद्यपानच नाही, तर अनेकदा चहा पितांनाची दृश्ये सुध्दा यात लक्षणीय आहेत.

Past the square, past the bridge

Past the mills, past the stacks

On a gathering storm comes

A tall handsome man

In a dusty black coat with

A red right hand

शिर्षक गीतातील हे कडव साधारणपणे पुढे काय बघायचे आहे याचे संकेत अगोदरच देतात. कथानक, शीर्षक गीत, प्रभावी संवादांची समयसूचकता व समतोल यामुळे ही वेबसिरीज स्वतःचे वेगळेपण सिध्द करणारी आहे. वेबसिरीज, पाश्चात्य पध्दती यातील सर्व गुणदोष यात निश्चितपणे आढळतात. Winston Churchill हे वास्तवात असूनही चर्चिलची काल्पनिक मांडणी कथा सत्यघटनेवर आधारलेली आहे असाच समज होतो. गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीच्या आयुष्यातील संभवीत अनेक प्रसंग नाट्यमय पद्धतीने प्रत्येक वळणावर उत्कंठा वाढवणारी ही वेबसिरिज. गुन्हेगारी प्रवृत्तीचा राजकीय वापर, त्यातून स्वतः चा हवा तसा फायदा अथवा गैरफायदा कसा करुन घेतला जातो अथवा जावू शकतो यावर वेबसिरीज अधिक प्रकाश पाडणारी आहे.

गुन्हेगारी विश्वाला आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक, सामाजिक, राजकीय कुठल्याच सीमा नाहीत, याची पदोपदी जाणीव या कथानकातून होते. Thomas Shelby आपले गुन्हेगारी विश्वात वर्चस्व सिध्द करतांना अनेकदा यश व अपयशाचा धनी होतो. मात्र एका प्रसंगात त्याचा लहान मुलगा त्याला शिक्षा द्यायला तु देव नाहीस सांगून वास्तविकतेची जाणीव करुन देतो. पुढे एका प्रसंगात Thomas Shelby नावाचा नायक पुढे I am not God yet म्हणत आपली महत्वाकांक्षा प्रकट करतो.

सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाने काल्पनिक कथेला सत्यकथेची वेशभूषा घातली आहे. शंभर वर्षापूर्वीचे प्रसंग दाखवतांना त्या काळाची वाहने, शस्त्र, इमारती, श्रध्दा अंधश्रध्दा याचे चित्रण शंभर वर्षानंतर सुध्दा त्याकाळात अगदी सहज डोकावते. Peaky Blinders नावाने ब्रिटनचा गुन्हेगारांचा एक समूह त्या काळात कार्यरत होता. मात्र या कथेचे केवळ नावापुरते साधर्म्य आहे. Thomas Shelby या नायका भोवताली कथानक असले तरी प्रत्येक पात्राने स्वतःचे महत्व अधोरेखित केले आहे. कथानकात प्रत्येक पात्राच्या भूमिकेला दिलेला न्याय लक्षणीय आहे. ज्यू, जिप्सी, कम्युनिस्ट, उजवे डावे सर्व विचारसरणीला कधीतरी या गुन्हेगारी विश्वाचा घटक व्हावं लागत याबाबत वेबसिरीजने समानता राखली आहे. शतकापूर्वीचा नायक त्याचे राहणीमान व शैली (style) आजच्या पेक्षा अधिक उजवी भासणारी आहे. ठेंगणा, निळ्या डोळ्यांच्या Cillian Murphy या Irish अभिनेत्याचे कौतुक करावे तितके कमीच. अनेक विषयांची एकत्रितपणे मांडणी असलेली वेबसिरिज म्हणजे Peaky Blinders Netflix वर उपलब्ध आहे. कृष्णधवल काळातील काल्पनिक कथेची रंगीत मांडणी आवर्जून बघण्यासारखीच आहे.

https://www.youtube.com/watch?v=Ruyl8_PT_y8

आपली प्रतिक्रिया द्या