पेणकरांना दिवा-बोईसरसाठी मिळणार हक्काची लोकल

251

सामना प्रतिनिधी, पेण

नोकरीधंद्यासाठी दिव्याहून ठाणे-मुंबईकडे आणि थेट वसई-विरार-बोईसरपर्यंत प्रवास करणाऱया पेणवासीयांना आता हक्काची लोकल मिळणार आहे. पनवेल ते पेण मार्गावरील एसी विद्युत प्रवाह आता डीसी झाल्यामुळे पेण ते दिवा आणि पेण-पनवेल-दिवा-वसई या मार्गावर आता रोज मेमू धावणार आहे. या मार्गावर बारा बोगी असलेल्या मेमूच्या अप आणि डाऊन अशा एकूण आठ फेऱ्या होणार असून त्यामुळे पेण तालुक्यातील 4 ते 5 लाख प्रवाशांचा नॉनस्टॉप प्रवास होणार आहे. उद्या सीवूड-नेरूळ-उरण या रेल्वे मार्गाच्या उद्घाटनातच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकने हिरवा झेंडा दाखवून या मेमू सेवेचे लोकार्पण होणार आहे.

शिवसेनेचा पाठपुरावा
दिव्याहून सुटणारी दिवा-रोहा आणि दादरहून सुटणारी दादर-रत्नागिरी या दोन ट्रेन सोडल्या तर पेणकरांसाठी तिसरी कोणतीही लोकल सेवा उपलब्ध नव्हती. महत्त्वाचे रेल्वे स्थानक आणि तालुक्याची लोकसंख्या पाच लाखांवर जाऊनही हक्काची लोकल सेवा मिळत नसल्याने शिवसेनेने वारंवार आंदोलन केले. शिवसेनेच्या या आंदोलनाला ‘मी पेणकर’, ‘आम्ही पेणकर’, ‘शाश्वत विकास समन्वय समिती’ यांचीही साथ लाभली.

पेणवासीयांच्या या प्रश्नासाठी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी पुढाकार घेऊन मार्च महिन्यात रेल्वे मंत्रालयासोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी रेल्वेचे अधिकारी, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन, उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर रेल्वे प्रशासन कामाला लागले आणि त्यानंतर तत्काळ पनवेल ते पेण एसी टू डीसी करंट करण्याचे काम वेगाने सुरू झाले.

छत्रपती शिवाजी टर्मिनस ते रोहे अशी हद्द असणाऱ्या मध्य रेल्वेने रोह्यापर्यंत लोकल सेवा सुरू करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पनवेल ते पेण मार्गावरील एसी करंट डीसी करण्याचे काम मध्य रेल्वेने नुकतेच पूर्ण केले.
उद्या सकाळी 11 वाजता पहिली पेण ते पनवेल मेमू लोकल धावणार आहे. या मेमूच्या देखभाल दुरुस्तीचे काम कळवा कारशेडमध्ये होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या कोचिंग विभागाने दिली. पेण ते दिवा या मार्गावर दातिवली, निळजे, तळोजे, नावडे, कळंबोली, पनवेल, सोमठणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर या मार्गावर ही मेमू थांबेल.

असे आहे वेळापत्रक
गाडी क्रमांक 61019 सकाळी 11.20 वाजता दिवा ते पेण.
गाडी क्रमांक 61020 दुपारी 1.55 वाजता पेण ते दिवा
गाडी क्रमांक 61015 सायंकाळी 6.45 वाजता दिवा ते पेण.
गाडी क्रमांक 61016 सायंकाळी 7.30 वाजता पेण ते दिवा.
दुपारी 1.53 वाजता पेण ते बोईसर.
सायं. 5.20 वाजता बोईसर ते पेण.

summary- pen diva and boisor people will get new local

आपली प्रतिक्रिया द्या