पेणमध्ये बाप-लेक ‘सेम टू सेम’, माजी सैनिकाने 48 व्या वर्षी मुलीसोबत दिली बारावीची परीक्षा; दोघांना सारखेच गुण

इच्छा असेल तर शक्ती मिळते आणि मार्गही मिळतो. त्यातूनच यशाचा झेंडा फडकवता येतो, हे एका माजी सैनिकाने पुन्हा एकदा दाखवून दिले. किरण गोरे असे त्यांचे नाव आहे. त्यांनी 32 वर्षांनंतर वयाच्या 48 व्या वर्षी आपल्या मुलीसोबत बारावीची परीक्षा दिली आणि गोरे हे कला शाखेतून फर्स्ट क्लास मिळवून उत्तीर्ण झालेच, पण त्यांना आणि त्यांच्या मुलीला सारखेच म्हणजे 75 टक्के गुण मिळाले आहेत.

किरण गोरे हे 1993 मध्ये दहावी पास झाले. त्यानंतर त्यांनी तीन वर्षांचे आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि लगेचच 1996 मध्ये हिंदुस्थानी सैन्य दलात भरती झाले. 16 वर्षे देशाची सेवा करून 2013 साली ते सैन्य दलातून निवृत्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा विभागाची परीक्षा देऊन ते महसूल विभागात रुजू झाले. सध्या ते पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर काम करीत आहेत, परंतु दहावीनंतर पुढील शिक्षण राहून गेल्याची रुखरुख त्यांना लागली होती आणि म्हणूनच आपले अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी बारावीच्या विज्ञान शाखेत शिकत असलेल्या मुलीसोबत परीक्षा द्यायची असे ठरवले. खालापूरमधील वावोशी हायस्कूलमध्ये गोरे शिकले होते. याच शाळेतून
त्यांनी कला शाखेतून 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा दिली.

निवडणुकीचे काम सांभाळून अभ्यास

शासकीय सेवेत असल्याने विधानसभा निवडणुकीचे काम करण्याकरिता त्यांना दिवस-रात्र धावपळ करावी लागली. मात्र नोकरीतील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी जिद्दीने अभ्यास केला. त्यांची मुलगी आर्या हिलाही विज्ञान शाखेतून बारावीच्या परीक्षेत 75 टक्के मिळाले. किरण गोरे हे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तब्बल 32 वर्षांनी बारावी पास झाले.