
केंद्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर बंदी लादली, गणेशमूर्तिकारांनी हा लढा लढल्याने न्यायालयाने ही बंदी शिथिल केली. पण त्याचे श्रेय लाटण्यासाठी मात्र पुन्हा भाजपचे नेतेच पुढे सरसावले. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते आशीष शेलार यांनी आज पेणमध्ये येऊन गणेशमूर्ती कारखानदारांकडून स्वतःचा सत्कार करवून घेतल्याने हा विषय पेणकरांमध्ये चर्चेचा ठरला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीच्या गणेशमूर्तीवर पाच वर्षांपूर्वी बंदी लादली. न्यायालयाने या नियमांचे पालन करण्याचे आदेश सरकारला दिले. त्यामुळे हजारो गणपती कारखानदार आणि गणेशमूर्तिकार अडचणीत सापडले होते. केवळ पेण तालुक्यात 1 हजार 600 लहान-मोठे गणेशमूर्ती कारखाने असून 17 लाख पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यात येतात. या बंदीमुळे 300 कोटी रुपयांचा हा व्यवसाय अडचणीत सापडला होता.
गर्दीसाठी उपस्थितीची सक्ती
गणेशमूर्तिकारांनी एकजुटीने याविरोधात न्यायालयात लढा दिला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेशमूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर घातलेली बंदी उठवली. मात्र याचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे नेते लगोलग पुढे सरसावले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री व रायगडचे संपर्कमंत्री आशीष शेलार आणि भाजपमुळेच ही बंदी हटल्याची पेणमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली. त्यानंतर शेलार यांनी पेण तालुक्यातील हमरापूर येथे जाऊन सत्कारही स्वीकारले. या कार्यक्रमाला गर्दी वाढवण्यासाठी तालुक्यातील सर्व गणेशमूर्ती कारखानदारांना उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आली. जे गणेशमूर्ती कारखानदार उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी दमबाजीही त्यांना करण्यात आल्याचा आरोप गणेशमूर्तिकारांनी केला आहे.