1 जानेवारीपासून कोणत्याही बँकेतून काढता येणार पेन्शनची रक्कम, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा

कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेंतंर्गत (ईपीएस) पेन्शन मिळणाऱया निवृत्ती वेतनधारकांसाठी दिलासा मिळणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून या पेन्शनर्सना देशातील कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल. पेंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयाचा 78 लाखांहून अधिक ईपीएस पेन्शनधारकांना फायदा होईल.

केंद्रीकृत प्रणाली ईपीएफओच्या आधुनिकिकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल. केंद्रीकृत प्रणालीद्वारे देशातील निवृत्ती वेतन वितरणाला मोठी मदत मिळेल. त्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर हस्तांतरित करण्याची गरज उरणार नाही. एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी गेल्यावर बँक अथवा शाखा बदलल्यावर यापूर्वी पेन्शन ऑर्डर द्यावी लागत होती. निवृत्तीनंतर अनेक निवृत्ती वेतनधारक त्यांच्या मूळ गावी गेल्यावर त्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. ती अडचण आता दूर होणार आहे.