गोव्यातून बिनधास्त घेऊन जा एकापेक्षा अधिक दारूच्या बाटल्या, पर्यटनवाढीसाठी गोवा सरकारचा विचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्यात खाण आणि पर्यटन व्यवसाय रसातळाला गेल्यामुळे गोवा सरकारच्या महसुलात प्रचंड घट झाली आहे. या पर्यटन व्यवसायाला पुन्हा नवी उभारी देण्यासाठी गोव्यात येणार्‍या पर्यटकांना एकापेक्षा अधिक दारूच्या बाटल्या नेण्याची परवानगी देण्याचा गोवा सरकार विचार करत आहे. हा निर्णय झाला तर निश्चित गोव्यातील पर्यटनालाही चालना मिळेल आणि महसुलातही वाढ होईल असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. याबाबतची माहिती आज गुरुवारी त्यांनी विधानसभेत दिली.

गोव्यात येणार्‍या पर्यटकांना सध्या देशी बनावटीची विदेशी दारूची बाटली आणि स्थानिक दारूची एक बाटली अशा दोन दोनच बाटल्या सोबत घेऊन जाण्याची परवानगी आहे, मात्र अनेक पर्यटक अवैधरीत्या दारूच्या एकापेक्षा अधिक बाटल्या सोबत घेऊन जातात. त्यामुळे पर्यटकांना एकापेक्षा अधिक दारूच्या बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी देण्याचा गोवा सरकार विचार करत आहे. याबाबत शेजारील राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटकशीही चर्चा करावी लागेल, असेही प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही एका माणसाला चारहून अधिक जास्त दारूच्या बाटल्या नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.

  • सध्या पर्यटकांना हिंदुस्थानी बनावटीची एक आणि स्थानिक दारूची एक अशा दोनच बाटल्या घेण्याची परवानगी आहे.
  • पर्यटनातून गोव्याला 500 कोटींचा महसूल मिळतो.
  • दरवर्षी गोव्यात 80 लाख पर्यटक येतात.
  • पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी गोवा सरकार प्रयत्नरत आहे.

दारूच्या तस्करीला आळा घालण्यासाठी प्रयत्न

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर दारूची मोठय़ा प्रमाणावर तस्करी होते. या तस्करीला आळा घालण्याचाही गोवा सरकारचा प्रयत्न आहे. गोव्यातून रस्तेमार्गे एकापेक्षा अधिक दारूच्या बाटल्या घेऊन जाताना महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर सीमा शुल्क अधिकार्‍यांकडून पर्यटकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो. पर्यटकांना होणारा हा त्रास थांबावा यासाठी त्यांना एकापेक्षा अधिक बाटल्या घेऊन जाण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्याचा सरकार विचार करत असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.