कर्जाचा ट्रेंड… 55.3 लाख कोटींचे कर्ज डोक्यावर, क्रेडिट कार्डच्या जीवावर पैशांची उधळपट्टी

सध्याच्या काळात कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे. एकप्रकारे कर्जाचा ट्रेंड आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, लोकांनी 55.3 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. एकप्रकारे हा विक्रम झाला आहे. लोकांनी सोने आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सर्वाधिक कर्ज काढले आहे. त्यामुळे वैयक्तिक कर्ज 14 टक्क्यांनी वाढले आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, जुलैमध्ये वैयक्तिक कर्जामध्ये 14.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासह कर्जाची रक्कम 55.3 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. सोन्यावर सर्वाधिक 39 टक्के कर्ज घेतले गेले, तर क्रेडिट कार्डवरून कर्ज घेण्याचे प्रमाण सोन्याच्या खालोखाल आहे.

यूपीआय व्यवहारांमध्ये 41 टक्के वाढ

ऑगस्ट महिन्यात यूपीआयमध्ये विक्रमी 14.96 अब्ज व्यवहार झाले असून त्यात 41 टक्के (वर्ष दर वर्ष) वाढ झाली आहे. यासह एपूण व्यवहाराची रक्कम 20.61 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 31 टक्क्यांनी अधिक आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (एनपीसीआय) आकडेवारीवरून ही माहिती मिळाली.

थकबाकी वाढली

क्रेडिट कार्डची थकबाकी ग्राहकांची संख्या वाढली आहे. कार्डवर कर्ज घेतले वा त्यातून पैसे खर्च केले, पण बिल भरले नाही. ही थकबाकी वार्षिक 22 टक्क्यांनी वाढून अंदाजे 2.8 लाख कोटी झाली.

उधारीवर खरेदी

अलीकडच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. कॅशबॅक आणि ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी लोक क्रेडिट कार्डचा वापर अधिक प्रमाणात करत आहेत. जुलै महिन्यात लोकांनी क्रेडिट कार्डचा वापर करून सुमारे 19 टक्के जास्त खरेदी केली. लोकांनी सुमारे 1.7 लाख कोटी रुपयांची खरेदी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केली. वर्षभरात क्रेडिट कार्ड खरेदी 39 टक्क्यांवरून वाढून 38.4 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.