गावातल्या एका कुटुंबातील 12 वर्षांच्या मुलीवर 28 वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याचा किळसवाणा प्रकार गोवंडी येथे घडला. बलात्कार केल्यानंतर आरोपी नेपाळला आपल्या गावी पळण्याचा प्रयत्नात होता, पण गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने ट्रेनमध्ये बसण्याआधीच त्याला उचलला.

रामकुमार खडका (28) असे त्या आरोपीचे नाव असून तो मूळ नेपाळचा आहे. तो सध्या चेंबूर येथील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत होता आणि त्याच परिसरात गावाकडील काही तरुणांसोबत राहत होता. तर गोवंडीच्या घाटला व्हिलेज परिसरात त्याच्या गावचे एक कुटुंबीय राहत होते. कुटुंबातील मोठ्या व्यक्ती एका कार्यक्रमासाठी बाहेर गेलेले असताना तक्रारदाराच्या अल्पवयीन बहिणी घरात होत्या. 22 तारखेच्या रात्री 11.30 च्या सुमारास कोणीच नसल्याचा गैरफायदा घेत रामकुमार याने 12 वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेची शिकार केली. त्याने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, तेवढ्यात तिचे घरचे आल्याने त्यांनी रामकुमारला रंगेहाथ पकडले, पण जमलेल्या गर्दीचा फायदा उचलत तेथून तो पळून गेला होता. त्यामुळे याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून गोवंडी पोलीस रामकुमारचा शोध घेत होते.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पकडला

गोवंडी येथील बलात्कारातील आरोपी रामकुमार हा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून गोल्डन टेंपल मेलने नेपाळला पळण्याच्या तयारी असल्याची खबर युनिट-3 ला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक नितीन पाटील, एपीआय भारते, भारती, उपनिरीक्षक पठाण तसेच अंमलदार जाधव, शेळके, पवार, कोळी आणि शिंदे या पथकाने रेल्वे स्थानकात सापळा रचून रामकुमार तेथे येताच त्याच्यावर झडप घातली. पुढील कारवाईसाठी त्याला गोवंडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या