
आंजर्ले उभाआगरआळी येथील निवासी वस्तीतील एका रहीवाशाच्या पाळीव कुत्र्याला बिबटयाने फस्त केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे निवासी भागातील बिबटयाच्या वावराने आंजर्ले येथील रहीवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दापोली तालूक्यातील सुप्रसिध्द कडयावरील गणपती मंदिर देवस्थानचे ठिकाण असलेल्या आंजर्ले गावातून जाणाऱ्या दापोली हर्णे आंजर्ले आडे पाडले केळशी मार्गावरील आंजर्ले उभाआगरआळी या सतत वर्दळ असणाऱ्या निवासी भागातील अगदी हम रस्त्याच्याकडेलाच निवास असलेल्या डॉ. शिवप्रसाद दांडेकर यांनी पाळलेल्या एका कुत्र्याला रात्रीच्या वेळेत बिबटयाने मारल्याच्या घटनेने आंजर्लेत खळबळ उडाली असून येथील रहीवाशांमध्ये झाल्या घटनेने घबराट निर्माण झाली आहे
आंजर्ले आणि आसपासच्या गावातील परिसरात बिबटयाचा वावर हा गेल्या दोन अडीच वर्षापासून सुरूच आहे. बिबटयाचा निर्धास्तपणा अनेकांनी आपल्या कॅमेरात टिपलेला आहे. याच परिसरातील सुकोंडी येथील एका शेतकऱ्याची गाय मारल्याची घटना घडली होती. आता परत एकदा बिबटयाचा वावर वाढला असून त्याने पाळीव कुत्र्याला मारून खाल्ल्याची घटना घडली आहे. डॉ. शिवप्रसाद दांडेकर आणि डॉ. प्रविणा शिवप्रसाद दांडेकर या डॉक्टर दांमत्यांनी पाळलेल्या कुत्र्याला बिबटयाने अक्ष़रशः फाडून खाल्ले. मानवी वस्तीत निर्धास्तपणे हिंस्त्र प्राण्यांच्या वाढलेल्या वावराने मानवी वस्तीलाच धोका निर्माण झाला आहे.
डॉ. प्रविणा दांडेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार, डॉक्टर दांपत्य वैदयकिय व्यवसाय करत असल्याने त्यांच्या येथे उपचारासाठी रात्री अपरात्री कोणीही उपचार्थी हे येत असतात. त्यामुळे सतत त्यांचे येथे दिवे लावलेले असतात. रात्री कुत्र्याला खाणं घालून त्याला साखळीने बांधून ठेवलेले होते. साधारणपणे ही घटना पहाटे चार साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेली असावी. नेहमी प्रमाणे सकाळी साडेसहा वाजता दांडेकर उठले असता पाहतात ते कुत्र्याला फाडून खाल्लेले त्यांच्या दृष्टीत पडले. त्यानंतर या घटनेची माहिती दापोली येथील वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनीसुध्दा बिबटयानेच कुत्र्याला मारल्याचा दुजोरा दिला असल्याचे डॉ. प्रविणा दांडेकर यांनी सांगितले.
भर मानवी वस्तीतील बिबटयाच्या शिरकावामुळे आज कुत्र्यावर निभावले असले तरी उदया मनुष्य हानी नाकारता येत नाही. त्यामुळे वाढलेल्या बिबटयाच्या संचाराचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशाप्रकारची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अडखळ गावचे विभाग प्रमुख तृशांत भाटकर यांनी केली आहे.