बेल्जियमचा सह्याद्रीप्रेमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शुभांगी बागडे

सह्याद्रीतल्या भ्रमंतीचं वेड आगळंच. सह्याद्रीचं प्रत्येक रूप भुलवणारं. त्यामुळेच एकदा का इथली माती पावलांना लागली की, ती परत यायला भाग पाडते. असंच वेड लागलेला एक युवक म्हणजे पीटर व्हॅन गेट. बेल्जियमचा हा पीटर व्हॅन गेट महाराष्ट्रात येतो काय आणि सह्याद्रीच्या, इथल्या संस्कृतीच्या प्रेमात पार बुडून जातो काय… या वेडातूनच पीटरने एक वेगळा विक्रम केला आहे. सह्याद्री आणि गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीच्या या वेडात पीटरने अवघ्या 60 दिवसांत 200 गडकिल्ल्यांना भेट दिली. या विक्रमाची नोंद गडकिल्ल्यांचं देखणेपण मिरवणाऱ्या महाराष्ट्राने घ्यायलाच हवी.

पीटर व्हॅन गेट मूळचा बेल्जियमचा. सिस्को कंपनीत मोठय़ा पदावर असलेल्या पीटरला कंपनीने हिंदुस्थानात नवीन इंजिनीअर भरतीसाठी पाठवले. अल्पकाळासाठीचा तो प्रकल्प होता. मात्र आपल्या देशाने त्याला भुरळ पाडली. त्यामुळेच पीटर गेली काही वर्षे कामानिमित्त चेन्नईत राहत आहे. भटपंतीची हौस असलेल्या पीटरने गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानातील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सांभाळत ऑफिसमधील लोकांनाही त्याने भटकंतीचे वेड लावले आहे. या वेडापायीच कार्यमुक्त होण्याचा निर्णय घेत खऱ्या अर्थाने आयुष्य जगायचे पीटरने ठरवले आणि इथंच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. इथूनच त्याच्या भटकंतीचा प्रवास सुरू झाला.

लहानपणापासूनच पीटरला मनमौजीपणे फिरण्याची भारी हौस. यामुळेच प्रवासही त्याच्यात आपोआपच भिनला गेला. चेन्नईत कामानिमित्त आलेल्या पीटरला हिंदुस्थानातील डोंगररांगा खुणावत होत्या. हिमालयाची भ्रमंती झाल्यानंतर त्याला सहय़ाद्री आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल समजलं. इथला इतिहास वाचताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचन केले आणि तो त्यांचा जणू भक्तच झाला. त्यानंतर त्याच्या मनात महाराजांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पुतूहल निर्माण झालं आणि पीटरची किल्ले भ्रमंती सुरू झाली. महाराजांच्या काळातील किल्ले, तिथल्या वास्तू यांचा मागोवा घेत भ्रमंती करत पीटरने अवघ्या 60 दिवसांत म्हणजेच दोन महिन्यांत शिवरायांच्या 200 गडकिल्ल्यांना भेटी दिल्या. ही फिरस्ती करताना केवळ किल्ला न पाहता तिथली वास्तुरचना, तटबंदी, जलव्यवस्था याबाबत जाणून घेणं हा अभ्यासही पीटरने केला. ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. इतिहास पाहणं आणि अनुभवणं यात नेमका कोणता फरक आहे हे पीटरच्या या उपक्रमामुळे आपल्याला नक्कीच कळतं.

पीटरच्या या प्रवासाची विभागणी त्याने वेगवेगळ्या मार्गांद्वारे केली. ‘मिशन ट्रान्स सहय़ाद्री’ ही त्याची मोहीम. यातील प्रत्येक मार्गाची पीटरने व्यवस्थित आखणी केली. एका रूटमध्ये लोणावळा ते नाणेघाट, दुसऱ्या रूटमध्ये नाणेघाट ते भंडारदरा, तिसऱ्या रूटमध्ये लोणावळा ते माथेरान, चौथ्या रूटमध्ये पुणे ते महाबळेश्वर, पाचव्या रूटमध्ये नाशिक ते अजंठा असा त्याने प्रवास केला. या पाचही मार्गांद्वारे त्याने 200 किल्ले सर करून एक वेगळाच विक्रम केला आहे.

पीटर एका दिवसामध्ये 100 किलोमीटरपर्यंतही धावू शकतो असं त्याने सांगितलं. त्यामुळं गड-किल्ले चढणं त्याच्यासाठी नक्कीच अवघड गोष्ट नाही. इतिहासाची आवड अभ्यासाद्वारे जोपासताना शारीरिक क्षमतेलाही जपायला हवं, असं त्याचं म्हणणं म्हणूनच योग्य वाटतं. या संपूर्ण प्रवासात पीटरला सर्वात जास्त भुरळ पाडली ती भंडारदरा भागातील किल्ल्यांनी. तसेच महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल असणारा आदर, प्रेम पाहून तो भावनिकही झाला. किल्ल्यांना भेट देताना असंच प्रेम आणि आदरातिथ्य आपण अनुभवलं असल्याचं तो आर्वजून सांगतो. आपल्या ग्रामीण भागात फिरताना त्याला भाषेचा कधीही अडसर जाणवला नाही. महाराष्ट्रातील लोक मला खूप प्रेम देतात असं म्हणत महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण खास आवडतं असंही पीटर सांगतो.

कमीत कमी सामान असणारी छोटीशी बॅग आणि चहुबाजूंचा वेध घेणारी नजर हा ऐवज घेऊन पीटरची भ्रमंती सुरू असते. मात्र त्याआधी जेथे जायचे आहे, त्याचा पूर्ण अभ्यास करून व तिथल्या भौगोलिकतेचा, संस्कृतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करूनच पीटर फिरतो. अगदी मोजके सामान व फोटो काढण्यासाठी एक मोबाईल फोन याव्यतिरिक्त काहीही न घेता त्याचा प्रवास सुरू असतो. सह्याद्री जितका भुलवणारा तितकंच त्याचं रौद्ररूपही दर्शवतो. त्याची भीती वाटत नाही का? असा प्रश्न विचारला असता पीटरचं उत्तर खूपच आशादायी वाटतं. ‘भीती’ हा शब्द मी माझ्या शब्दकोशातून वगळला आहे. भीतीपोटी आपण आपले जीवन खऱ्या अर्थाने जगत नाही, असं तो म्हणतो.

‘डाय विथ मेमरीज, नॉट ड्रीम्स’ हे ब्रीदवाक्य असणारा बेल्जियमचा अवलिया म्हणजे पीटर. एका वेगळ्या ध्यासाने आणि वेडाने पछाडलेला. सह्याद्रीच्या भ्रमंतीचं वेडच असं असतं. अवखळ वारा प्यायलेल्या सह्याद्रीची लेकरं हे जाणतातच, पण पीटरसारख्या विदेशी लोकांनाही सह्याद्रीने असंच वेड लावलं आहे हेही खरंच!

[email protected]