
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने राज्यातील तरुण-तरुणींसाठी निर्यात-आयात (Export-Import) लॉजिस्टिक्स क्षेत्रातील प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दादर येथील शिवसेना भवनात करण्यात आले.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)

फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया (एफएफएफएआय) ची शैक्षणिक शाखा असलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स (आयआयएफएफ) च्या सहकार्याने स्थानीय लोकाधिकार महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

कस्टम्स क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटबाबत सर्वांगीण प्रशिक्षण देऊन तरुण-तरुणी आणि महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेत यशस्वी झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

असा असेल अभ्यासक्रम…
- प्रशिक्षण कालावधी सहा आठवडे
- लॉजिस्टिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांकडून धडे

- अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन
- थिअरीसह प्रात्यक्षिकाची जोड

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्गो हब, विशेष आर्थिक क्षेत्रे (एसईझेड) आणि महाराष्ट्रातील नवीन लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांमुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. मराठी तरुण-तरुणींना या संधींसाठी प्रशिक्षित केल्यास त्यांना तिथे नोकरीच्या संधी हमखास मिळू शकणार आहेत.

























































