
कबुतरांमुळे होणारे घातक रोग टाळण्यासाठी मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मात्र अशा प्रकारे कबुतरखाने बंद केले, कबुतरांचे दाणा-पाणी बंद केले तर त्यामुळे ही कबुतरे इमारती, वस्तींमध्ये शिरून त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे नागरी वस्तीबाहेर कबुतर पार्क उभारण्यासाठी राज्य सरकार मुंबई महापालिकेत निर्देश देईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी महिन्याभरात कबुतरखाने बंद झाल्यानंतर कबुतरे निवासी इमारतीत आश्रय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना त्रास होईल. कबुतरांच्या विष्ठेमुळे क्षय रोगासारखे घातक रोग पसरून लोकांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे नागरी वस्तीच्या बाहेर कबुतरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून या पक्ष्याचे जतन करावे, अशी मागणी केली. याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, कबुतरांच्या विष्ठेमुळे अनेक आजार होतात, तसा केईएम रुग्णालयाचा अहवाल असल्याने मुंबईतील कबुतरखाने बंद झाले पाहिजेत, ही मुंबईतल्या लोकप्रतिनिधींची मागणी असल्याचे सामंत म्हणाले.
z कबुतरांना कुठे येऊ नका, हे सांगण्यासाठी आपण त्यांच्यामध्ये जनजागृती करू शकत नाही. पण कबुतरांचे थवेच्या थवे कॉलनी किंवा घरामध्ये आले तरी अडचण होऊ शकते. त्यामुळे कबुतरांना चांगल्या प्रकारे दाणा-पाणी देऊन जगवता येईल, यासाठी महापालिकेला निर्देश दिले जातील, अशी माहिती सामंत यांनी दिली.