हा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा!

61

सामना ऑनलाईन । न्यू यॉर्क

शिजवलेल्या अन्न पदार्थाचं आयुष्य हे फारच कमी असतं. अवघ्या काही तासात ते अन्न खराब होतं. ही गोष्ट सर्व प्रदेशांच्या अन्नाला लागू पडते. पण, जर कुणी तुम्हाला सांगितलं की एखादा पदार्थ तीन वर्षं ताजा राहू शकतो, तर तुमचा विश्वास बसेल का? हो. ही गोष्ट खरी आहे. एका कंपनीने तीन वर्षं ताजा राहणारा पिझ्झा बनवला आहे.

अमेरिकेतील एका कंपनीने त्यांच्या सैन्यासाठी या पिझ्झाचा शोध लावला आहे. यापूर्वी जे अन्न अमेरिकन सैन्याला दिलं जात होतं, त्यात अनेक जिन्नस होते. त्यातल्या शिजवलेलं मांस आणि एक रोल या जिन्नसांमुळे अमेरिकन सैन्य आजारीही पडत असे. त्यामुळे शिजवून खाण्याच्या अन्नपदार्थांऐवजी तयार जिन्नस किंवा सुके पदार्थ खाण्याकडे सैनिकांचा कल अधिक असायचा. पण आता त्यांच्यासाठी हा पिझ्झा उपलब्ध झाला आहे. यात एक पाच इंचाच्या तुकड्यावर न वितळणारं चीज आणि जास्त काळ टिकून राहणारे जिन्नस वापरलेले आहेत.

हे पिझ्झा स्लाइस एका हवाबंद कंटेनरमध्ये पॅक केले जातात. त्यामुळे त्यांना बदलत्या हवामानापासून वाचवता येतं. अशा स्थितीत आतील पिझ्झा हा तीन वर्षांपर्यंत ताजा राहू शकतो. युद्धभूमीवर आणीबाणीच्या स्थितीत इतर कोणत्याही पदार्थासारखे हे पिझ्झा स्लाइसही सैनिक खाऊ शकतात. हे पिझ्झा तयार करण्यापूर्वी अमेरिकन सैन्याचा कलही बघण्यात आला. एरवीच्या त्याच त्या जेवणाऐवजी त्यांनीही या पिझ्झाला पसंती दिल्याने आता त्यांच्या युद्ध भूमीवरील आहारात या पिझ्झाचा समावेश केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या