प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामाचा लिलाव नुकताच मुंबईत पार पडला. यात अनेक बड्या खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाण घेतले. तर गेल्या काही हंगामात बक्कळ कमाई करणाऱ्या खेळाडूंना काही लाखांमध्ये समाधान मानावे लागले. मात्र कोकणचा सुपुत्र असणाऱ्या अजिंक्य पवारची लॉटरी लागली असून तो कोट्यधीश झाला आहे.
अजिंक्य पवार याची बेस प्राईज 20 लाख रुपये होती. सर्वात आधी बंगळुरू बुल्सने त्याच्यावर बोली लावली. त्यानंतर तेलुगू टायटन्सही शर्यतीत उतरली. पाठोपाठ यूपी योद्धा आणि जयपूर पिंक पँथर्सही यात उतरल्याने चार संघात रस्सीखेच सुरू झाली. बघता बघता अजिंक्य पवारची किंमत 85 लाखांवर गेली. त्यानंतर यू मुंबानेही हात आजमावून बघितला आणि बोली लावली. अखेरपर्यंत यू मुंबा आणि बंगळुरु बुल्समध्ये रस्सीखेच पहायला मिळाली. मात्र बंगळुरु बुल्सने 1.10 कोटी मोजत त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
अजिंक्य पवार याने प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात पदार्पण केले होते. त्यावेळी तो जयपूर पिंक पँथर्स संघाकडून खेळला. पहिल्याच वर्षी खेळताना त्याने 17 लढतीत 75 गुण मिळवले. त्यानंतर पुढच्या हंगामात जयपूरने त्याला कायम ठेवले. त्यानंतर तमिळ थलायवाजने त्याला आपल्याकडे ओढले. गेल्या तीन हंगामापासून तमिळ थलायवाजकडून खेळत होता. चपळता आणि लेफ्ट साईडचा रेडर ही खासियत असल्यानेच दोन वेळच्या जयपूर पिंक पँथर्सने त्याच्यासाठी आपली पर्स ओपन केली. मात्र अखेर बंगळुरूने बाजी मारली.
सचिन ठरला महागडा खेळाडू
तमिळ थलायवाजने खरेदी केलेला सचिन हा खेळाडू (2.15 कोटी) यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. या लिलावात एकूण 12 संघांनी संघांनी एकूण 118 खेळाडूंची खरेदी केली. पुणेरी पलटणने 66 लाख रुपयांत खरेदी केलेला अजित कुमार हा क गटातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर, बंगळुरू बुल्स संघाने जय भगवानला 63 लाख रुपयांत खरेदी केल्याने त्यालाही लॉटरी लागली. बंगाल वॉरियर्सने 41 लाख रुपयांत खरेदी केलेला अर्जुन राठी ड गटातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
आठ खेळाडू झाले कोट्यधीश
सचिन तन्वर (2.15 कोटी) – तमिळ थलायवाज
मोहम्मदरेझा शादलोई चियानेह (2.07 कोटी) – हरियाणा स्टीलर्स
गुमान सिंह (1.97 कोटी) – गुजरात जायंट्स
पवन सेहरावत -(1.72 कोटी) – तेलुगू टायटन्स
भारत हुड्डा (1.30 कोटी) – यूपी योद्धा
मनिंदर सिंह (1.15 कोटी) – बंगाल वॉरियर्स
सुनील कुमार (1.15 कोटी) – यू मुंबा
अजिंक्य पवार (1.10 कोटी) – बंगळुरू बुल्स