
अमेरिकेतील मेन (Maine) राज्यात भीषण विमान अपघात झाला. बँगोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर टेकऑफनंतर एका खासगी जेटने पेट घेतला आणि ‘बॉम्बार्डियर चॅलेंजर 600’ जातीचे हे विमान धावपट्टीवर कोसळले. रविवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या विमानामध्ये एकूण 8 प्रवासी होते अशी माहिती फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने दिली आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. हे विमान ह्युस्टनहून बँगोरला आले होते आणि तेथून पुन्हा उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असताना अपघातग्रस्त झाले. सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोंमध्ये विमानाच्या ढिगाऱ्यातून धुराचे लोट निघताना दिसत आहेत.
FAA weather cameras at Bangor International Airport in Maine show severely reduced visibility due to heavy snow. pic.twitter.com/vzz3SKoLXx
— Breaking Alert (@BreakingAlert_) January 26, 2026
एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने फेसबुकवर थरारक अनुभव शेअर केला आहे. आम्ही फ्लोरिडाहून बँगोरमध्ये उतरलोच होतो, तेवढ्यात आमच्या मागे 8 प्रवासी असलेले एक विमान कोसळताना आम्ही पाहिले. धावपट्टीवर बर्फ साचलेला होता आणि धुराचे लोट उठत होते, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.
दुसऱ्या एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज आणि हादरे मैलोनमैल लांबपर्यंत जाणवले. काहींनी तर विमान उलटे होऊन जमिनीवर कोसळल्याचा दावा केला आहे, मात्र अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, या घटनेनंतर बँगोर आंतरराष्ट्रीय विमानतळ तात्काळ बंद करण्यात आले असून सर्व विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळ प्रशासनाने नागरिकांना परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. विमानात असलेल्या 8 जणांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एफएए आणि संबंधित यंत्रणा या अपघाताचा सखोल तपास करत आहेत.



























































