
थर्माकोल आणि प्लास्टिकच्या पिशव्यांनंतर केंद्र सरकार अजून 12 वस्तूंवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. ही बंदी टप्याटप्याने केली जाणार आहे. केंद्र सरकारने या वस्तूंची यादी तयार केली असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाला ही यादी दिली जाणार आहे. यात 50 मायक्रोनपेक्षा पातळ प्लास्टीक पिशव्या, फोमचे कप, लेमिनेट केलेल्या प्लेटस, बाऊल, छोटे प्लास्टीककप यासंह इतर वस्तूंचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. यावेळी 50 मायक्रोनपेक्षा पातळ प्लास्टीक पिशव्या, फोमचे कप, लेमिनेट केलेल्या प्लेटस, बाऊल, छोटे प्लास्टीक कप आणि कंटेनर,प्लास्टीकच्या काड्या, इयर बड्स, फुगे, झेंडे आणि कँडी सिगारेटची थोटूकं, पॉलिस्ट्रीन, पेयांचे छोटे पाकिट (200 एमएलहून कमी) आणि रस्त्याच्या बाजूला लावण्यात येणाऱ्या बॅनर्सचाही या यादीत समावेश आहे. देशातील प्रदूषण नियंत्रण विभागाने फक्त एकदाच वापरात येणारे प्लास्टीक 2022 नष्ट करण्यासाठी योजना आखली आहे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यापार्श्वभूमीवर प्लास्टीकची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्लास्टीकचा पर्याय सुचवण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.




























































