राज्यभरात प्लॅस्टिक सर्जरी सुरू!

सामना प्रतिनिधी । मुंबई

बहुचर्चित प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीला आज संपूर्ण राज्यात सुरुवात झाली. मुंबई वगळता अन्य सर्व महापालिकांनी दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. दंड भरल्याच्या पावत्या आज सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. मुंबईत मात्र महापालिकेने दोन दिवस ‘गांधीगिरी’ करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आज सर्वसामान्य तसेच दुकानदार, फेरीवाल्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. उद्या रविवारीही अशीच विनंती फेरी काढण्यात येणार आहे. मात्र सोमवारपासून धडक कारवाईला सुरुवात होईल आणि पावत्या फाडल्या जातील, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

राज्य सरकारने गुढीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू केली. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी २३ जूनपासून करण्यात येणार होती. प्लॅस्टिकची पिशवी हातात दिसल्यास पाच हजार रुपये दंड करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आज सकाळपासून सर्वसामान्यांमध्ये या कारवाईबद्दल उत्सुकता आणि भीती होती. त्यानुसार आज पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, मीरा भाईंदर अशा मुंबईच्या जवळच्या सर्वच महापालिकांच्या हद्दीत प्लॅस्टिकचा वापर करणाऱया दुकानदारांवर ५००० रुपयांचा दंड आकारण्यात आल्या. त्याच्या पावत्या आज दिवसभर सोशल मीडियावरून फिरत होत्या. मुंबई महापालिकेने कारवाईसाठी नेमलेले निरीक्षक मात्र आज त्यांना नेमून दिलेल्या विभागात जाऊन दुकानदार, सर्वसामान्य मुंबईकर, फेरीवाले यांना प्लॅस्टिकच्या पिशव्या न वापरण्याबद्दल विनवत होते.

सोमवारपासून कारवाई
उद्या रविवारीसुद्धा मोठमोठे मॉल, इंटरनॅशनल ब्रॅण्ड, मोठय़ा ब्रॅण्डची चेन असलेली दुकाने यांच्याकडे जाऊन त्यांच्यातही जनजागृती केली जाणार आहे. त्यांच्याकडे असलेले प्लॅस्टिक कुठे जमा करायचे याचीही माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर मात्र सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाई केली जाणार आहे. – किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, प्लॅस्टिकबंदी जनजागृतीचे समन्वयक

प्रदर्शन पाहण्यासाठी मुंबईकरांच्या रांगा
प्लॅस्टिकला पर्याय काय याचे उत्तर देणारे अनोखे प्रदर्शन पालिकेच्या नियोजन विभागातर्फे वरळीतून नॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे भरवण्यात आले आहे. शुक्रवारी शिवसेना नेते- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाला प्रारंभ झाला. आज दिवसभरात पाच हजार लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. शाळेतील विद्यार्थी, हॉटेल इंडस्ट्रीसारख्या विविध क्षेत्रातील व्यावसायिक, मोठमोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली होती. आपापल्या व्यवसायात प्लॅस्टिकला काय पर्याय आहेत याची चाचपणी करण्यासाठी व्यावसायिक येथे आले होते.

सोलापुरात सांगली, नगरमध्ये दंडाची कारवाई
सोलापूर महापालिकेने शहरातील ४३ व्यापाऱयांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असा दोन लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तर सांगली आणि मिरज शहरांमध्ये १५ ठिकाणी कारवाई करीत ७५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नगर महापालिका हद्दीत तीन ठिकाणी कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. दरम्यान, जप्त केलेल्या प्लॅस्टिकचा वापर रस्ते बनविण्यासाठी होणार असल्याची माहिती सांगलीचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली आहे. दुसरीकडे सातारा, कोल्हापूर शहरात अद्यापि कारवाई सुरू करण्यात आली नाही. कारवाई करण्यासाठी २३ पथके सज्ज आहेत.

आज रविवार मच्छी, मटण स्टीलच्या डब्यातून
आज रविवार… मटण, चिकन, मासे खवय्यांचा हक्काचा वार… आता हे कशातून आणायचे ? पण यावर ग्राहकांनीच उपाय शोधला असून उद्या मुंबईभर लागलेल्या रांगांमध्ये स्टीलचे डबे दिसणार आहेत. त्याची सुरुवात आजपासूनच झाली. आज काही ग्राहकांनी अशा डब्यांमधून मटण, चिकन आणि मासे उद्याच्या मेजवानीसाठी नेले.