मुंबईत आता प्लॅस्टिकचे रस्ते, डांबरी रस्त्यांसाठी पाच टक्के प्लॅस्टिक बंधनकारक

599

>> देवेंद्र भगत

मुंबईत आता वर्षानुवर्षे टिकणारे प्लॅस्टिकयुक्त मजबूत रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यासाठी डांबरी रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना रोड मटेरियलमध्ये पाच टक्के प्लॅस्टिक वापरणे बंधनकारक करण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धन, प्लॅस्टिकमुक्ती आणि मजबूत-टिकावू रस्त्यांसाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.

मुंबईसह राज्यभरात 23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या बाजार, दुकाने-आस्थापना आणि अनुज्ञापन विभागातील 310 निरीक्षकांच्या माध्यमातून मुंबईभरात जोरदार कारवाई सुरू आहे. निळा कोट आणि काळी टोपी घातलेल्या निरीक्षकांकडून व्यवसायिक, दुकानदारांवर धाडी टाकून ही कारकाई करण्यात येत आहे. यामध्ये पर्यावरणाला हानीकारक प्लॅस्टिकचे उत्पादन थांबवतानाच प्लॅस्टिकच्या पिशव्यांसारख्या प्लॅस्टिकचा उपयोग रस्त्यांसाठी करण्यात येणार आहे. जेणेकरून विघटनासाठी वर्षानुवर्षे लागणारे प्लॅस्टिक रस्त्यासाठी वापरल्यास वर्षानुवर्षे टिकणारे मजबूत रस्ते मुंबईकरांना मिळणार आहेत.

4 कोटी 32 लाखांचा दंड
23 जून 2018 पासून प्लॅस्टिकबंदीनंतर पालिकेने 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत मुंबईभरात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 4 कोटी 32 लाख 20 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 1433691 भेटी देण्यात आल्या. यामध्ये 78985.213 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.
विघटनासाठी वर्षानुवर्षे लागणारे आणि वातावरणातील बदलांचा परिणाम न होणारे प्लॅस्टिक डांबरी रस्त्यांमध्ये पाच टक्के वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईतील रस्ते मजबूत आणि वर्षानुवर्षे टिकणारे बनतील.
प्रवीण परदेशी, पालिका आयुक्त
पुनप्रक्रियेसाठी साखळी
प्लॅस्टिकचा पुनर्वापर रोग्यरीत्या करण्यासाठी पालिका साखळी निर्माण करीत आहे. यामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून प्लॅस्टिकचा पुनर्वापर योग्यरीतीने करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यामध्ये खुर्च्या, टेबल, टी-शर्ट, पाइप यासाठी या प्लॅस्टिकचा वापर करण्यात येत आहे. मुंबईत 68 ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्रे पालिकेने कार्यान्वित केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या