वैशाख वणव्याच्या होरपळीत जीव कासावीस झाला असताना मान्सून दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झाला. मुंबई शहर परिसरासह उपनगरांत शनिवारी मध्यरात्रीपासून मान्सूनने दमदार हजेरी लावली. 24 तासांत 60 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी रात्रीही जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे उकाडा ‘गुल’ होऊन हवेत सुखद गारवा पसरला आहे. 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला मान्सूनची वाट वादळाने रोखली होती. त्यामुळे तो उशिराने, 24 जूनला मुंबईत दाखल झाला होता. यंदा मात्र मान्सूनने कमाल केली आणि मुंबई-ठाण्यात 11 जूनच्या संभाव्य तारखेच्या दोन दिवस आधीच ‘एण्ट्री’ मारली. मुंबईकर, ठाणेकर मागील काही दिवसांपासून जणू भट्टी पेटल्याची होरपळ सहन करीत होते. उकाडय़ाचा दाह शमवण्यासाठी जोराचा पाऊस कधी येतोय याचीच सर्व जण चातकाप्रमाणे वाट पाहत होते. अशातच मान्सूनने ‘वीकेण्ड’चा मुहूर्त साधत शहर व उपनगरांत दमदार हजेरी लावली आणि लगेचच हवामान खात्यानेही मान्सूनच्या हजेरीवर ‘अधिकृत’ शिक्कामोर्तब केले. यंदा मान्सूनच्या मार्गात कुठलाही अडसर आला नाही. त्यामुळे तो मुंबईत निर्धारित वेळेआधीच दाखल झाला, अशी प्रतिक्रिया हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिली.
अनेक ठिकाणी पाणी साचले
पालिकेने सर्व प्रभागांत नालेसफाईची कामे युद्धपातळीवर केल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात पहिल्याच पावसात पालिकेचा दावा ‘फुस्स’ ठरला. अंधेरी रेल्वे स्थानक पूर्व परिसर, दहिसर पूर्वेकडील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले. जोगेश्वरी, गोरेगाव परिसरातही गटारांतील कचरा रस्त्यांवर आला. रविवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुंबईत 60 मिमीहून अधिक पाऊस झाला.
तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस
मान्सून मुंबईतील सुरुवात ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह ‘गाजवणार’ आहे. पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल. मुंबईच्या तुलनेत ठाणे जिह्यात पावसाचा जोर अधिक राहील, असे भाकीत वर्तवत हवामान खात्याने मुंबई, ठाण्यासाठी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
तापमानात मोठी घट
पावसाच्या दमदार हजेरीनंतर तापमानात मोठी घट झाली. शनिवारी सांताक्रुझचा पारा 36.4 अंशांवर झेपावला होता. त्यात रविवारी चार अंशांची घट झाली आणि कमाल तापमान 32.4 अंश इतके नोंद झाले. तसेच किमान तापमानाचा पाराही दोन अंशांनी खाली घसरला.