मोदी, तुम्ही 12 वर्षे पीएम आहात तेवढी वर्षे नेहरू जेलमध्ये होते! प्रियंका गांधी यांचा हल्ला

नरेंद्र मोदी भाषण चांगलं करतात, पण सत्य सांगण्यात कमी पडतात. लोकांना सत्य कसं सांगायचं हीसुद्धा एक कला असते. पण मी कोणी कलाकार नाही. मी लोकप्रतिनिधी आहे. मला सत्य सांगावेच लागेल.

‘वंदे मातरम्’वरील चर्चेत भाग घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरू यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी खणखणीत उत्तर दिले. ‘नरेंद्र मोदी जितकी वर्षे सत्तेत आहेत, तितकी वर्षे नेहरूंनी देशासाठी तुरुंगात काढली होती, तरीही मोदी त्यांच्यावर टीका करतात,’ अशी बोचरी टीका प्रियंका गांधी यांनी मोदींवर केली.

‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगान आहे. त्यावर चर्चा करण्याची गरजच काय? राष्ट्रगानावर प्रश्न उपस्थित करणे हा स्वातंत्र्यसैनिकांचा व हुतात्म्यांचा अपमान आहे, असे प्रियंका यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. मात्र, यामागे सरकारचे दोन हेतू आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक येतेय. त्यासाठी मोदींना ही चर्चा हवी आहे. तसेच, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला, बलिदान दिले त्यांच्यावर आरोप करण्यास संधी मिळावी हा यामागचा हेतू आहे. देशाचे लक्ष ज्वलंत मुद्दय़ांपासून विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप प्रियंका यांनी केला.

तुम्ही नेहरूंवर टीका करता, पण…

‘नेहरूंवर सतत टीका करणारे हे विसरतात की, नेहरूंनी ’इस्रो’ बनवले नसते तर आज ‘मंगलयान’ उडाले नसते… डीआरडीओ बनवला नसता तर ‘तेजस’ बनले नसते… आयआयटी, आयआयएम बनवले नसते तर आपण आज आयटीमध्ये पुढे गेलो नसतो… ‘एम्स’ उभारले नसते तर कोरोनाचे आव्हान आपण कसे पेलले असते… मोदी सरकारने जे विकायला काढले आहे, ते भेल, सेल, गेल, भाक्रा-नांगल नेहरूंच्या काळात झाले नसते तर विकसित भारताच्या गप्पा तुम्ही कशा केल्या असत्या,’ अशा शब्दांत प्रियंका यांनी सत्ताधाऱ्यांना झोडपून काढले.

आरएसएसच्या कार्यक्रमात वंदे मातरम् गातात का?

प्रियंका यांनी यावेळी मोदींच्या भाषणाची चिरफाड केली. वंदे मातरमच्या विषयावर नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात झालेल्या संवादाची अर्धवट माहिती मोदींनी कशी दिली, हे प्रियंका यांनी पुराव्यासह सांगितले. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरम् गायले जाते. भाजप किंवा आरएसएसच्या अधिवेशनात ते गायले जाते का, असा सवाल प्रियंका यांनी केला.

मोदी हे मास्टर डिस्टोरियन

पंतप्रधान मोदी हे ‘मास्टर डिस्टोरियन’ असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी तीन प्रश्न उपस्थित केले.

  • लाहोरमध्ये पाकिस्तानचा ठराव मांडणाऱया व्यक्तीसोबत कोणत्या नेत्याने युती केली होती? ते श्यामाप्रसाद मुखर्जी होते.
  • जून 2005 मध्ये कराचीमध्ये कोणत्या हिंदुस्थानी नेत्याने जिना यांचे काwतुक केले होते? ते लालकृष्ण आडवाणी होते.
  • 2009 मध्ये कोणत्या भारतीय नेत्याने त्याच्या पुस्तकात जिना यांचे काwतुक केले होते? ते जसवंत सिंह होते.