
‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा ‘नेहरू’विरोधी राग आळवला. मोदींनी आपल्या भाषणात आठ वेळा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख केला. ‘नेहरूंनी मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी मुस्लिम लीगपुढे गुडघे टेकून ‘वंदे मातरम्’चे तुकडे केले,’ असा आरोप मोदींनी केला.
‘वंदे मातरम्’वरील चर्चेची सुरुवात मोदींच्या भाषणाने झाली. या वेळी मोदींनी ब्रिटिश राजवटीपासून ते आतापर्यंतच्या ‘वंदे मातरम्’च्या प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी काँग्रेस व नेहरूंवर दोषारोप केले. मुस्लिम लीगने ‘वंदे मातरम्’ला विरोध दर्शवला होता. जिना यांनी वंदे मातरम्विरोधाचा नारा दिला होता. त्यामुळे नेहरू घाबरले. नेहरू यांनी त्या वेळी मुस्लिम लीगला सडेतोड उत्तर देण्याऐवजी ‘वंदे मातरम्’चीच पडताळणी सुरू केली. ‘वंदे मातरम्’मुळे मुस्लिमांच्या भावना भडकू शकतात या जिनांच्या मताशी मी सहमत आहे, असे पत्र त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लिहिले. त्यानंतर मूळ गीतातील काही ओळी वगळून राष्ट्रगान म्हणून वंदे मातरम् पुढे आणले गेले. काँग्रेसची ही लांगूलचालनाची नीती आजही तशीच आहे, असे मोदी म्हणाले.
हे केवळ गाणे नाही, मंत्र!
‘वंदे मातरम् हे केवळ एक गाणे नसून मंत्र आहे. याच मंत्राने देशाला स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. विदेशी कंपन्यांना आव्हान दिले. हा मंत्र म्हणजे 2047 पर्यंत विकसित हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्रेरणा आहे. आमच्या सरकारला स्वदेशीला बळ द्यायचे आहे, त्यासाठी वंदे मातरम् हाच आमचा मंत्र असेल,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज राज्यसभेत चर्चा
‘वंदे मातरम्’वर उद्या बुधवारी राज्यसभेत चर्चा होणार आहे. गृहमंत्री अमित शहा या चर्चेला सुरुवात करतील.


























































