मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर या बैठखीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी 20 जून रोजी लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांशी चर्चा करणार आहेत.

17 व्या लोकसभेच्या पहिल्या अर्थसंकल्प अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी 16 जून रोजी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महत्त्वाचे विधेयक पास करण्यासाठी विरोधकांनी मदत करावी अशी विनंती सरकारने केली आहे. या विधेयकांमध्ये तिहेरी तलाकसारख्या विधेयकाचाही समावेश आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या बुधवारी मंजुरी दिलेली आहे.

मोदी सरकार सुरुवातीपासून ‘एक देश, एक निवडणूक’ यावर ठाम आहे. परंतु काँग्रेसचा मात्र याला कायम विरोध राहिला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हा मुद्दा पुन्हा वर आला तेव्हाही काँग्रेसने याचा तीव्र विरोध केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि पी चिदंबरम यासह अन्य नेत्यांनी याला विरोध दर्शवला होता. काँग्रेसने त्यावेळी विधी आयोगाच्या प्रमुखांची भेट घेऊन आपला विरोध व्यक्त केला होता.