
‘हिंदुस्थानी सागरी क्षेत्राने वेगाने आणि ताकदीने प्रगती करत आहेत. देशातील बंदरे जगातील सर्वात कार्यक्षम बंदरांपैकी आहेत. काही बाबतीत विकसित देशांपेक्षाही उत्तम कामगिरी करत आहेत,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.
‘मुंबई मेरीटाइम वीक 2025’च्या निमित्ताने झालेल्या मेरीटाइम लीडर्स कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते. तब्बल 85 देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले आहेत. या कॉनक्लेव्हला संबोधित करताना मोदींनी देशातील सागरी क्षेत्राच्या विकासाचा आढावा घेतला. जागतिक तणाव आणि व्यापारी अडथळय़ांच्या काळात हिंदुस्थानचे सागरी क्षेत्र जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावू शकते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मेरीटाईम इंडिया व्हिजनअंतर्गत सरकारने 150 हून अधिक उपक्रम सुरू केले आहेत. शेकडो वर्षे जुने शिपिंग कायदे बदलून त्या जागी 21 व्या शतकाशी सुसंगत कायदे आणले आहेत. त्यामुळे सागरी क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. गोरेगावातील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 27 ते 31 ऑक्टोबरपर्यंत ही कॉनक्लेव्ह चालणार आहे.
आयएमयूचे 14 सामंजस्य करार
मेरीटाईम लीडर्स कॉनक्लेव्हमध्ये इंडियन मेरीटाइम युनिव्हर्सिटीने जर्मनी, नेदरलॅण्ड्स, सिंगापूर आणि इतर अनेक देशांमधील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय विद्यापीठे, संशोधन संस्था आणि उद्योजकांसोबत 14 महत्त्वाचे सामंजस्य करार केले. या सहकार्य करारामुळे शैक्षणिक देवाणघेवाण, दुहेरी पदवी अभ्यासक्रम, संयुक्त संशोधन आणि परदेशी काwशल्य विकासाला चालना मिळणार आहे. तसेच हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर सागरी क्षेत्रात करियरची संधी मिळणार आहे.






























































