पंतप्रधान मोदींची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी ‘फोन पे चर्चा’, या गोष्टीवर झाले एकमत

2433

जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत असून मृतांचा आकडा 55 हजार पार गेला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोन वरून चर्चा केली. चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कोरोनाचा संयुक्तपणे आणि पूर्ण ताकदीने सामना करायचा यावर सहमती झाली.

जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतील रुग्णांचा आकडा 2 लाख 80 हजारांवर पोहोचला आहे. हिंदुस्थानतही गेल्या दोन ते तीन दिवसात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. हिंदुस्थानमध्ये रुग्णांचा आकडा 3000 हजारांवर गेला आहे. जागतिक समस्या बनलेल्या याच कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्याबाबत आणि उपाययोजनाबाबत चर्चा झाली. मोदी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. आमच्यात कोरोना व्हायरसबाबत चर्चा झाली. हिंदुस्थान आणि अमेरिका संयुक्तपणे आणि पूर्ण ताकदीनिशी कोरोनाचा सामना करण्यास तयार आहेत, असे ट्विट मोदींनी केले.

विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करत आहेत. तसेच 8 एप्रिलला ते सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील विरोधी पक्ष नेत्यांशी संवाद साधणार आहेत. लॉकडाऊनमुळे लोकसभा आणि राज्यसभा स्थगित झाल्यानंतर ते पाहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधतील.

आपली प्रतिक्रिया द्या