बिल्डरांची माफियागिरी मोडून काढणार, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

1048

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने भ्रष्टाचारातून कमावलेला काळा पैसा खपवण्यासाठी रिअल इस्टेटमध्ये माफियांचे अड्डे निर्माण केले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत या अड्डय़ांना सुरुंग लागला. अंडरवर्ल्डशी साटेलोटे करून सर्वसामान्यांना त्रास देणाऱया  या बिल्डरांची माफियागिरी यापुढेही मोडीत काढणारच, असे ठाम प्रतिपादन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. शेतकर्‍यांची छळवणूक करून त्यांच्या जमिनी हडपण्याचे आणि गोरगरीबांचे घर हिसकावून घेण्याचे दिवसही आता संपले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खारघर येथील सेंट्रल पार्कजवळील मैदानावर आज महायुतीची भव्य प्रचारसभा झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आघाडीच्या बिल्डरधार्जिण्या धोरणावर सडकून टीका केली. ते म्हणाले, रेरा कायद्याची निर्मिती पूर्वीच झाली होती. मात्र आपला काळा पैसा खपवण्यासाठी काँग्रेसने या कायद्याची अंमलबजावणी केली नाही.  महायुतीचे सरकार येताच हा कायदा आम्ही कठोरपणे राबवला. त्यामुळे रिअल इस्टेटच्या नावाखाली माफियांचे अड्डे चालवणार्‍यांचे धाबे दणाणले. जे बिल्डर इमानदारीने काम करीत आहेत त्यांच्या पाठीशी सरकार  खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महायुतीचे उमेदवार मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, नरेंद्र पाटील, गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.

मच्छीमार हे सागराचे चौकीदार

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप-आरपीआय आघाडीचेच सरकार येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे आपल्या भाषणात सांगितले. कोकणातील मच्छीमारांबद्दल गौरवोद्गार काढताना ते म्हणाले की, मच्छीमार म्हणजे सागराचे चौकीदार आहेत. त्यांच्या हितासाठी तसेच कोकणात पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक योजना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून आणणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या